Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ठाणे जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी; १,०५६ उपक्रमांतून हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक; आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप, जनसेवेचा संकल्प कायम ठेवण्याचे आवाहन

ठाणे : शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ने यशाचा नवा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला व बालविकास आणि समाजकल्याण यांसह विविध विभागांमार्फत तब्बल १,०५६ उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतून हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियानाच्या यशाबद्दल प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्यापासून शिक्षणापर्यंत विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अभियानांतर्गत जिल्हाभरात आरोग्य तपासणी शिबिरे, आशा स्वयंसेविकांसाठी प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन, ‘फिट इंडिया’अंतर्गत क्रीडा स्पर्धा, शालेय गणवेश, खुर्च्या व वॉटर कुलरचे वाटप, स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांना आवश्यक दाखले देण्यासोबतच ‘बिरसा मुंडा’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन’ योजनांतील लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.

ग्रामीण आणि आदिवासी भागांतील नागरिकांपर्यंत पोहोच

शहापूर, मुरबाड आणि भिवंडी परिसरातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये प्रशासनाने घोंगडी बैठकांच्या माध्यमातून थेट पाड्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला. माहितीचा अभाव किंवा कागदपत्रांशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे कोणताही गरजू नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम केले, असे शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन हे अभियान राबविण्यात आले. अभियान संपले असले तरी जनसेवेचा हा संकल्प एका उपक्रमापुरता मर्यादित न ठेवता निरंतर सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्रात मिळणार चालना; उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य करणार – मुख्यमंत्री फडणवीस

‘जनसेवा हीच प्रशासनाची प्राथमिकता’

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ नोकरी म्हणून काम न करता अंतःकरणापासून जनसेवा करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीता’तील विचारांचा संदर्भ देत कोणतेही कार्य मनापासून आणि सेवाभावाने केले, तरच ते खऱ्या अर्थाने यशस्वी होते, असे त्यांनी नमूद केले.

केवळ काही दिवसांचा ‘सौजन्य सप्ताह’ साजरा करण्याऐवजी नागरिकांशी कायम सौजन्याने आणि संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा सेवाभाव कायम जपावा, असेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना दिलासा देणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या काळात शहरी नागरिक आणि सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन त्यांनी केले.

आदिवासी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शक्तीची ऊर्जा आणि नवदुर्गांची प्रेरणा घेऊन प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याचा संकल्प अधिक बळकट करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (DMFT) अंतर्गत आदिवासी आश्रमशाळांतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. साधना जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button