Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांना मतदानासाठी धमकावल्यास शिक्षण संस्थांची मान्यता रद्द करणार; बावनकुळेंचा संस्थाचालकांना इशारा

शिक्षण संस्थाचालकांकडून शिक्षकांवर प्रचारासाठी दबाव आणल्यास एसआयटी चौकशीचा इशारा; अमरावती शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक यांना विजयी करण्याचे आवाहन

अमरावती : शिक्षकांना विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी धमकावले किंवा नोकरीवरून काढण्याचा दबाव आणला, तर संबंधित शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करू, असा इशारा भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षकांवर निवडणूक प्रचारासाठी दबाव आणल्यास संबंधित संस्थांची एसआयटी चौकशी लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमरावती शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

बावनकुळे म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार मजबूत असून, विधानसभेतील २८८ पैकी २३२ आमदार महायुतीचे आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील जागावाटपाबाबत आपण यापूर्वी भाष्य केले होते. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. विदर्भातही महायुती मजबूत असून, सर्व नेते एकत्रितपणे काम करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीच्या विरोधात कोणीही काम करू नये, अशा सूचना दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. महायुतीने एकदा निर्णय घेतल्यानंतर सर्वांनी त्या निर्णयानुसार काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षकांना धमकावल्यास कठोर कारवाई

मतदान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, शिक्षकांवर मतदानासाठी दबाव आणणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. एखाद्या शिक्षण संस्थेने आपल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी शिक्षकांना धमकावले किंवा मतदान न केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी दिली, तर संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

शिक्षकांवर प्रचारासाठी दबाव आणून त्यांच्या शिक्षणाशी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असेल, तर अशा संस्थांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  ठाणे जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी; १,०५६ उपक्रमांतून हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

किरण सरनाईक यांना विजयी करण्याचे आवाहन

अमरावती शिक्षक मतदारसंघातून महायुतीने किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक केवळ उमेदवाराच्या विजयापुरती मर्यादित नसून शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महत्त्वाची आहे, असे बावनकुळे म्हणाले.

शिक्षकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याची क्षमता किरण सरनाईक यांच्यात असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांनी सरनाईक यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले. राज्यातील पाचही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुष्काळ निवारणासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेली सर्व कामे करण्यावर शासनाचा भर असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. निवडणूक महत्त्वाची असली, तरी शेतकऱ्यांना मदत करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कर्नाटकातील शेतकऱ्यांना मदत केली जात असेल, तर महाराष्ट्रात मदत करण्यास काय अडचण आहे, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. काही राजकीय व्यक्ती शिक्षण संस्थांचा वापर निवडणुकीसाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महानगरपालिकांच्या शाळा खासगी शाळांपेक्षाही चांगल्या करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button