औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्रात मिळणार चालना; उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य करणार – मुख्यमंत्री फडणवीस
ॲस्ट्राझेनेकाच्या गोरेगाव येथील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेसाठी नवोन्मेषावर भर

मुंबई : औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देऊन आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, किफायतशीर आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औषधनिर्मिती कंपन्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास या क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक धोरणात्मक आणि अन्य सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडच्या गोरेगाव येथील मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कंपनीचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली, आशियाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
संशोधन आणि नवोन्मेषावर भर देण्याची गरज
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताने जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या कडक नियमन असलेल्या बाजारपेठांमध्येही भारतीय जेनेरिक औषधांना मोठी मागणी आहे. भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची गुणवत्ता आणि क्षमता जागतिक स्तरावर सिद्ध झाली आहे. आता या क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेष वाढविण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारण्यात येणारा बल्क ड्रग पार्क औषधनिर्मिती क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरेल आणि त्यातून या उद्योगात व्यापक बदल घडतील, असे त्यांनी नमूद केले.
कोविड काळातील योगदानाचे स्मरण
कोविड-१९ महामारीच्या काळात ॲस्ट्राझेनेकाने दिलेले योगदान भारत विसरणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोविशिल्ड लसीमुळे देशातील नागरिकांना मोठा आधार मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘लस मैत्री’ उपक्रमांतर्गत भारताने ९९ देशांना कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला. या माध्यमातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीय संस्कृतीतील भावना जगासमोर प्रत्यक्षात आली. या कार्यात ॲस्ट्राझेनेकाचे योगदान महत्त्वपूर्ण होते, असेही त्यांनी सांगितले.
कर्करोगासह गंभीर आजारांवरील उपचारांसाठी संशोधन आवश्यक
आरोग्यसेवेतील परिवर्तनासाठी नवोन्मेष महत्त्वाचा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, औषधनिर्मिती, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि निदान पद्धतींमध्ये नवनवीन संशोधन होत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अचूक निदान, रुग्णाच्या गरजेनुसार उपचार आणि आधुनिक औषधांच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा दर्जा उंचावता येईल. प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी नवोन्मेष महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठे आणि संशोधन संस्थांशी सहकार्याचे आवाहन
महाराष्ट्रात जागतिक दर्जाची विद्यापीठे येत असून, ॲस्ट्राझेनेकाने या विद्यापीठांसह राज्यातील नामांकित संशोधन संस्थांशी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अशा सहकार्यामुळे संशोधनाला संस्थात्मक स्वरूप मिळेल आणि नवोन्मेष क्षेत्रात कार्यरत तरुणांच्या प्रतिभेचा उपयोग होईल. मुंबईतील मुख्यालयाच्या माध्यमातून कंपनीने संशोधन, औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवेच्या विविध क्षेत्रांत विस्तार करावा. उद्योगांची वाढ राज्याच्या विकासाशी जोडलेली असल्याने उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली यांनी प्रास्ताविकात मुंबईतील मुख्यालयामागील भूमिका स्पष्ट केली. भारताच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेशी आणि महाराष्ट्राच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या दृष्टिकोनाशी कंपनीचे उद्दिष्ट सुसंगत आहे. भारताला नवोन्मेषाधारित अर्थव्यवस्था बनविण्यासाठी औषधनिर्मिती आणि जैवऔषध क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
ॲस्ट्राझेनेका ही जागतिक औषधनिर्मिती कंपनी असून, विज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कर्करोगावरील उपचारांमध्ये परिवर्तन घडविण्यासोबतच श्वसनविकार, जैवऔषधे आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठीही कंपनी संशोधन करीत आहे. विज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी उपयुक्त कार्य करत कंपनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान देईल, असे अक्किनेपल्ली यांनी सांगितले.




