Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सासोलीत १४.५८ लाखांचे नूतन तलाठी कार्यालय; महसूल सेवा होणार अधिक सुलभ!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण; नागरिकांना डिजिटल महसूल सेवांची माहिती मिळावी यासाठी कार्यालयात क्यूआर कोडची सुविधा

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १४.५८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांना महसुली कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन शासकीय सेवा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या योजनेंतर्गत या कार्यालयासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. आरसीसी फ्रेम, लाल विटांच्या भिंती, अंतर्गत व बाह्य गिलावा, व्हिट्रिफाइड फरशी आणि रंगकाम अशा विविध कामांचा या इमारतीत समावेश आहे.

डिजिटल महसूल सेवांसाठी क्यूआर कोड

नूतन तलाठी कार्यालयात महसूल विभागाच्या ई-प्रणालीविषयक सुविधांची माहिती नागरिकांना सहज मिळावी, यासाठी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी या क्यूआर कोडचे स्कॅनिंग करून संबंधित सुविधांची पाहणी केली. डिजिटल माध्यमातून महसूलविषयक सेवा आणि माहिती उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची त्यांनी माहिती घेतली.

या डिजिटल सुविधांमुळे नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवांविषयी माहिती मिळविणे अधिक सोयीचे होण्याची अपेक्षा आहे. नव्या कार्यालयामुळे सासोली परिसरातील महसुली कामकाजाला सुविधा मिळण्याबरोबरच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा –  मुंबई महापालिकेच्या शाळांत ‘स्मार्ट नागरिक’ उपक्रम सुरू; संविधानिक मूल्यांचे धडे घेणार विद्यार्थी!

मान्यवरांची उपस्थिती

या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी सीमा गोवेकर उपस्थित होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button