Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबई महापालिकेच्या शाळांत ‘स्मार्ट नागरिक’ उपक्रम सुरू; संविधानिक मूल्यांचे धडे घेणार विद्यार्थी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन; ‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तिकेवर आधारित परीक्षा जानेवारी २०२७ मध्ये, गुणवंत विद्यार्थ्यांना सिंगापूर दौऱ्याची संधी

मुंबई : विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्यांच्यात संविधानिक मूल्ये, सामाजिक संवेदनशीलता, नागरिक म्हणून अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव रुजविणेही आवश्यक आहे. या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत (स्मार्ट नागरिक)’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित होते.

मुंबईतील दादर पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात नागरिकशास्त्र आणि संविधानिक मूल्यांवर आधारित ‘स्मार्ट नागरिक’ तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमित साटम, महेश सावंत, कालिदास कोळंबकर, शिक्षण समिती सभापती राजश्री शिरवडकर आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीवही महत्त्वाची : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांना विविध संवादमाध्यमांतून जगभरातील माहिती सहज उपलब्ध होते. त्यामुळे माहितीपूर्ण आणि हुशार पिढी घडत असली, तरी तिच्यात सामाजिक जाणीव आणि कर्तव्यभावना रुजविणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाजाने उभ्या केलेल्या व्यवस्थेमुळे व्यक्तीला शिक्षण घेता येते आणि व्यक्तिमत्त्व विकसित करता येते. त्यामुळे समाजाप्रती आपलीही जबाबदारी आहे, याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे भारताच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन आहे. संविधानातील समता, न्याय आणि समान संधी या मूल्यांचा अंगीकार केल्यास विद्यार्थी विकसित भारताच्या उभारणीत योगदान देणारे जबाबदार नागरिक बनतील. संविधानाने दिलेले अधिकार समजून घेण्याबरोबरच त्यात नमूद केलेल्या कर्तव्यांचे पालन करणेही आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-जमातींना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या कार्यातून एकता, निर्भयता आणि समाजाप्रती संवेदनशीलता ही मूल्ये दिसून येतात. विद्यार्थ्यांनी या मूल्यांसह संविधानातील तत्त्वे समजून घेऊन समाज आणि देशासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

बालवयातच संविधानिक मूल्ये रुजवावीत : भूषण गवई

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. भारतीय राज्यघटनेमुळे देशाची एकता आणि अखंडता टिकून राहण्यास मदत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याबरोबरच राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयातच बिंबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतःच्या हक्कांबरोबरच इतरांच्या स्वातंत्र्याचा आणि अधिकारांचाही आदर केला पाहिजे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, पर्यावरणाची काळजी आणि नागरिक म्हणून कर्तव्यांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे गवई यांनी नमूद केले.

हेही वाचा –  राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६; सांगलीच्या मोरया गणेश मंडळाचा राज्यात डंका!

‘सिटिझन सायन्स’ आणि संविधानिक मूल्यांचा अभ्यास

आमदार अमित साटम यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, ‘स्मार्ट नागरिक’ अभ्यासक्रमात ‘सिटिझन सायन्स’ आणि ‘कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज’ या संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. शिक्षक आणि विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, भविष्यात देशातील अन्य शैक्षणिक मंडळांनीही अशा प्रकारचा अभ्यासक्रम स्वीकारावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महापालिका शाळांमधील ५० गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) विषयांचा अनुभव मिळावा, यासाठी सिंगापूर येथे शैक्षणिक अभ्यासदौऱ्यावर पाठविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थी अशा संधींपासून वंचित राहू नयेत, या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व असल्याचे भूषण गवई यांनी नमूद केले.

‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तिकेवर जानेवारीत परीक्षा

महापौर रितू तावडे यांनी ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिका महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा पदवी मिळविणे नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि जबाबदारीने जगण्याची ताकद मिळविणे होय, असे त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, पाणी आणि वीज बचत, सामाजिक समानता तसेच सार्वजनिक संसाधनांचा जबाबदारीने वापर यांचे शिक्षण दिले जाणार आहे. ‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तिकेवर आधारित मराठी भाषेतील परीक्षा जानेवारी २०२७ मध्ये घेण्याचा मानस असून, विजेत्या विद्यार्थ्यांचा १४ एप्रिल २०२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गौरव करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

मैदाने, उद्याने आणि सायकल ट्रॅकची विद्यार्थ्यांकडून मागणी

उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी इयत्ता सहावीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी शहरातील खेळाची मैदाने, उद्याने आणि सायकल चालविण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले.

उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत अधिकाधिक मैदाने खेळासाठी खुली करणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि चांगली उद्याने विकसित करण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. काही ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आले असून, अन्य ठिकाणीही असे मार्ग विकसित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

इयत्ता सहावीतील मयुरा देशमुख, रेवांश अण्णम, अभय पांचाळ, समर्थ कांबळे आणि त्रिशा जाधव या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये, शहरातील सुविधा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. भूषण गवई यांनीही विद्यार्थ्यांना संविधान आणि डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानाची समज, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button