TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

MHADA Pune Lottery : म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी अर्जदारांची चिंता वाढली! महा-आयटीच्या सेवा बंद, २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज कसा करणार?

डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची पडताळणी रखडण्याची शक्यता; अर्जदारांकडून पुन्हा मुदतवाढीची मागणी, म्हाडाच्या निर्णयाकडे लक्ष

पुणे : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, महा-आयटीच्या सेवा १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून २१ ऑक्टोबरपर्यंत तांत्रिक देखभालीसाठी बंद राहणार असल्याने अर्जदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. डोमिसाईल प्रमाणपत्र आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची ऑनलाइन पडताळणी वेळेत पूर्ण होईल का, असा प्रश्न अर्जदारांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे म्हाडा पुन्हा मुदतवाढ देणार का, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

म्हाडाकडून मुदतवाढ; तरीही अर्जदारांची चिंता

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत ४,४६२ सदनिकांच्या विक्रीसाठी म्हाडाकडून संगणकीय सोडत आयोजित करण्यात आली आहे. अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करताना डोमिसाईल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी लागते.

महा-आयटीकडून डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची पडताळणी होण्यास विलंब होत असल्याने अर्जदारांच्या विनंतीचा विचार करून म्हाडाने अर्ज सादर करण्याची मुदत २२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. मात्र, आता महा-आयटीच्या सेवा बंद राहणार असल्याच्या सूचनेमुळे अर्जदारांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा –  शिंदेंच्या शिवसेनेला धक्का? अब्दुल सत्तारांचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत नवं समीकरण

शेवटच्या दोन दिवसांत अर्ज पूर्ण करणे शक्य होणार?

महा-आयटीच्या अधिकृत सूचनेनुसार, संबंधित पोर्टल सेवा १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून २१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध नसतील. त्यामुळे या कालावधीत आवश्यक प्रमाणपत्रांची पडताळणी रखडल्यास अर्जदारांना २२ ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करणे कठीण जाऊ शकते.

प्रमाणपत्रे मंजूर झाल्यानंतर अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल का, असा प्रश्न अर्जदार विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडा आणखी मुदतवाढ देणार का, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

पुणे म्हाडा सोडतीला मोठा प्रतिसाद

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीला अर्जदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत १,६७,५७० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,०४,०८६ अर्जांसोबत अनामत रक्कम जमा करण्यात आली होती.

म्हाडाची घरे कोणत्या भागांत उपलब्ध?

१५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे परिसरातील मांजरी खुर्द, म्हाळुंगे आणि भूगाव येथील सदनिका उपलब्ध आहेत.

२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबवेवाडी, मुंढवा, उंड्री, वडगाव, बावधन आणि कोंढवा खुर्द या भागांत घरे उपलब्ध आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी, किवळे, डुडुळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव या भागांतील सदनिकांचाही योजनेत समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button