“हा निर्लज्ज खलनायक कोण? हे ‘दिमागी नक्षल’!”; प्रकाश राज यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू भडकले

नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेच्या विरोधात राजधानी दिल्लीत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) आणि ‘इंडिया’ आघाडीचे आंदोलन सुरू असतानाच आता या आंदोलनावरून नवा वाद पेटला आहे. आंदोलनाला सुरुवातीपासून उघड पाठिंबा देणारे अभिनेते प्रकाश राज यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रकाश राज यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. रिजिजू यांनी प्रकाश राज यांचा उल्लेख थेट “दिमागी नक्षल” आणि “निर्लज्ज खलनायक” असा केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सीजेपीच्या एका पत्रकार परिषदेतील आहे. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रकाश राज यांना प्रश्न विचारला की, “तुमच्यावर असा आरोप केला जात आहे की, तुम्ही आणि इतर काही लोक आंदोलनादरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्रास देत आहात. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?” पत्रकाराचा हा प्रश्न ऐकताच प्रकाश राज मोठ्याने हसले आणि त्यांनी “हा एक चांगला विनोद होता, खूपच चांगला,” अशी उपरोधिक टिप्पणी करत आरोप फेटाळून लावला.
हेही वाचा
पुणे महानगरातील एचसीएमटीआर व इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती
प्रकाश राज यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र संताप व्यक्त केला. रिजिजू यांनी लिहिले की, “ही आपली भारतीय संस्कृती नाही. हा निर्लज्ज खलनायक कोण आहे? हे दिमागी नक्षल लोक भारतीय संस्कृतीला नष्ट करत आहेत.” महिला पोलिसांवरील कथित गैरवर्तनाच्या गंभीर प्रश्नाला विनोदात उडवल्याबद्दल सत्ताधाऱ्यांकडून प्रकाश राज यांच्यावर जोरदार आक्षेप घेतला जात आहे.
सीजेपीच्या प्रत्येक आंदोलनात प्रकाश राज यांची साथ
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी असो किंवा आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लढा असो, प्रकाश राज सातत्याने कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आले आहेत. मात्र, महिला पोलिसांसंदर्भातील प्रश्नावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आता प्रकाश राज आणि विरोधक पुन्हा एकदा भाजपच्या रडारवर आले आहेत.




