महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प उभारा, गुंतवणूक वाढवा; चेक कंपन्यांना जयकुमार रावल यांचे आवाहन
वाहननिर्मिती, रोबोटिक्स, AI, संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत सहकार्याच्या संधी; भारत-चेक औद्योगिक भागीदारीसाठी उद्योग प्रतिनिधींची बैठक

मुंबई : चेक प्रजासत्ताकातील कंपन्यांनी केवळ भारतीय बाजारपेठेत उत्पादने विकण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प उभारावेत, गुंतवणूक वाढवावी आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीतून दीर्घकालीन औद्योगिक भागीदारी विकसित करावी, असे आवाहन राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले. वाहननिर्मिती, अभियांत्रिकी, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संरक्षण आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांत महाराष्ट्र आणि चेक प्रजासत्ताक यांच्यात सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय उद्योग महासंघाच्या (CII) वतीने चेक प्रजासत्ताकाचे उपपंतप्रधान व व्यापारमंत्री कारेल हॅवलिक यांच्या उपस्थितीत भारतीय आणि चेक उद्योग प्रतिनिधींची बैठक मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री रावल बोलत होते.
महाराष्ट्रातील औद्योगिक क्षमतेचा लाभ घेण्याचे आवाहन
चेक प्रजासत्ताकाची अभियांत्रिकी, वाहननिर्मिती, अवकाश उद्योग, आधुनिक यंत्रसामग्री, रोबोटिक्स आणि वैज्ञानिक संशोधनातील क्षमता, तसेच महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता यांची सांगड घातल्यास औद्योगिक सहकार्याला चालना मिळू शकते, असे रावल यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई हे आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र, पुणे हे वाहननिर्मिती व अभियांत्रिकीचे प्रमुख केंद्र, तर नाशिक हे उत्पादन, अवकाश उद्योग आणि कृषी क्षेत्रातील संधींसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अन्य औद्योगिक केंद्रांमध्येही उत्पादन क्षेत्राचा विस्तार होत आहे. या औद्योगिक परिसंस्थेचा लाभ चेक कंपन्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा – महाराष्ट्रात शाळा प्रवेशाचे वय टप्प्याटप्प्याने बदलणार; पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षांची अट २०३०-३१ पासून
AI, इलेक्ट्रिक वाहने आणि संरक्षण क्षेत्रात संधी
वाहननिर्मिती, औद्योगिक स्वयंचलन, इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, अवकाश उद्योगाशी संबंधित उत्पादन आणि संरक्षण क्षेत्रातील पुरवठा साखळी या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या संधी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा आणि लेझर तंत्रज्ञानासारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही चेक कंपन्यांनी महाराष्ट्रातील उद्योगांसोबत काम करावे, असे रावल म्हणाले.
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा कार्यक्षमता, कृषी व अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग तंत्रज्ञान, आधुनिक बांधकाम आणि स्मार्ट इमारत उपाययोजना यांमध्येही संयुक्त प्रकल्प राबविता येऊ शकतात. अशा भागीदारीमुळे उत्पादकता आणि मूल्यवर्धन वाढण्याबरोबरच शेतकरी, स्थानिक उद्योग आणि कुशल मनुष्यबळासाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे चेक मंत्र्यांकडून कौतुक
चेक प्रजासत्ताकाचे उपपंतप्रधान व व्यापारमंत्री कारेल हॅवलिक यांनी भारताच्या आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे कौतुक केले. भारतातील औद्योगिक क्षमता आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी चेक प्रजासत्ताकाचे प्रतिनिधीमंडळ भारताच्या दौऱ्यावर आले आहे. दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई येथील भेटींमधून विविध उद्योगक्षेत्रांतील भागीदारीच्या संधी शोधल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
चेक प्रजासत्ताकाची विद्यापीठे, संशोधन व विकास व्यवस्था आणि मूल्यवर्धित उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्था ही महत्त्वाची बलस्थाने आहेत. भारतासोबत औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्यास चेक प्रजासत्ताक उत्सुक असल्याचे हॅवलिक यांनी नमूद केले.
संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर भर
भारत-चेक आर्थिक भागीदारी संयुक्त उत्पादन, सह-विकास, तंत्रज्ञान भागीदारी आणि नवोन्मेषावर आधारित नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे CII च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष वीर अडवाणी यांनी सांगितले. महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील औद्योगिक परिसंस्था चेक उद्योगांसाठी उपयुक्त ठरू शकते. तसेच चेक प्रजासत्ताक भारतीय कंपन्यांना युरोपीय बाजारपेठा, उत्पादन साखळ्या आणि नवोन्मेष समूहांशी जोडण्यासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीदरम्यान विविध उद्योगसमूहांमध्ये परस्पर सामंजस्य करार करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि औद्योगिक भागीदारीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




