दिवाळीत एसटी प्रवास महागणार नाही! प्रताप सरनाईक यांनी १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळला
१ ते १५ नोव्हेंबरदरम्यान प्रस्तावित होती भाडेवाढ; शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्याला प्राधान्य

मुंबई : दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटी प्रवासासाठी प्रस्तावित केलेली १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नामंजूर केली आहे. दुष्काळ, महागाई आणि आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना त्यांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे प्रस्तावित भाडेवाढीपासून प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
दरवर्षी दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने मंत्री सरनाईक यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणे योग्य ठरणार नाही, असे सांगत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला.
‘आधीच संकटांनी घेरलेल्या जनतेला भाडेवाढीचा चटका देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे मला मान्य नाही,’ अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली.
‘लालपरी’ ग्रामीण महाराष्ट्राचा आधार
एसटीची ‘लालपरी’ ही ग्रामीण महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गासाठी एसटी हा परवडणाऱ्या प्रवासाचा प्रमुख आधार आहे. त्यामुळे भाडेवाढीचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन खर्चावर झाला असता. विशेषतः दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना हा अतिरिक्त खर्च सहन करणे कठीण झाले असते.
‘शासन संवेदनशील आहे. संकटाच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही,’ असा विश्वास व्यक्त करत जनतेच्या अडचणी समजून घेऊन दिलासा देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
हेही वाचा – महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प उभारा, गुंतवणूक वाढवा; चेक कंपन्यांना जयकुमार रावल यांचे आवाहन
पर्यायी उपाययोजनांवर भर
एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असला, तरी त्याची भरपाई थेट प्रवाशांकडून करणे योग्य ठरणार नाही, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुर्गम गावांपासून शहरांपर्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी प्रवासी सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींवर पर्यायी मार्गांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल; मात्र संकटाच्या काळात सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रस्तावित १५ टक्के भाडेवाढीला नकार देऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याचे या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.




