TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात शाळा प्रवेशाचे वय टप्प्याटप्प्याने बदलणार; पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षांची अट २०३०-३१ पासून

नर्सरीसाठी ३, ज्युनिअर केजीसाठी ४, तर सिनिअर केजीसाठी ५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक; ३० जून ही वय मोजण्याची निश्चित तारीख

मुंबई : महाराष्ट्रातील शाळांमध्ये पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) मधील तरतुदींनुसार प्रवेशाचे वयाचे निकष टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, बालकाचे निर्धारित वय संबंधित वर्षाच्या ३० जूनपर्यंत पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. या नियमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून सुरू होणार आहे.

कोणत्या वर्गासाठी किती वय आवश्यक?

राज्य शासनाने निश्चित केलेले वयाचे निकष पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने लागू होतील.

बालवाटिका-१ (नर्सरी): शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून प्रवेशासाठी ३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

बालवाटिका-२ (ज्युनिअर केजी): शैक्षणिक वर्ष २०२८-२९ पासून ४ वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

बालवाटिका-३ (सिनिअर केजी): शैक्षणिक वर्ष २०२९-३० पासून ५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

इयत्ता पहिली: शैक्षणिक वर्ष २०३०-३१ पासून प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

हेही वाचा –  CJP च्या ‘लहरा दो तिरंगा मार्च’समोर नवे आव्हान; दिल्लीतील सेंट्रल पार्क दोन दिवस बंद, अभिजीत दीपकेंचा सवाल

सध्याच्या विद्यार्थ्यांना दिलासा

पालक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेल्या विद्यमान विद्यार्थ्यांना नवीन वयाचे निकष लागू होणार नाहीत, असे शासन निर्णयात नमूद असल्याचे वृत्त आहे.

तसेच, मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना वयाच्या नव्या निकषांमुळे अडथळा येणार नाही. पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देण्याचे अधिकारही शाळाप्रमुखांना देण्यात आले आहेत.

सर्व बोर्डांच्या शाळांना समान नियम

यापूर्वी राज्य मंडळ, CBSE, ICSE आणि IB अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी वय मोजण्याच्या तारखांमध्ये फरक असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. पूर्वप्राथमिक वर्गांच्या प्रवेशासाठीही सर्वत्र एकसमान वयाचे निकष लागू नव्हते.

आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि केंद्र शासनाच्या सूचनांनुसार महाराष्ट्रातील विविध बोर्डांच्या शाळांमध्ये प्रवेशाचे निकष एकसमान करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत.

या निर्णयामुळे शाळा प्रवेश प्रक्रियेत वयाबाबत एकसमानता आणण्याचा आणि पूर्वप्राथमिक शिक्षणापासून इयत्ता पहिलीपर्यंतचा शैक्षणिक टप्पा नियोजनबद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button