जंतर-मंतरवर घुसण्याचा प्रयत्न; सीजेपीचे सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे पोलिसांच्या ताब्यात!

नवी दिल्ली | जंतर-मंतरवरून आंदोलनस्थळाची अधिकृत मान्यता रद्द केल्यानंतरही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांच्यासह आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे या तिघांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरातून ताब्यात घेतले आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या कारवाईची माहिती दिली. यापूर्वी १० ऑक्टोबर रोजीही या नेत्यांना विमानाने दिल्लीत पोहोचताच ताब्यात घेण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव दास, आशुतोष रांका आणि त्यांचे काही सहकारी जंतर-मंतर लगत असलेल्या जेडीयू (JDU) कार्यालयाच्या परिसरात पोहोचले. तेथील गेटवरून उड्या मारून हे कार्यकर्ते जंतर-मंतरच्या बंदी घातलेल्या भागात घुसले. यानंतर तिथे घोषणाबाजी सुरू असताना पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तिन्ही प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. जंतर-मंतरवर आंदोलनास बंदी असताना बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलीस या तिघांवर अधिकृत गुन्हा (FIR) दाखल करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
पूंछमध्ये घुसखोरीचा डाव उधळला; भूसुरुंग स्फोटात लष्कर कमांडरसह ४ दहशतवादी ठार!
सीजेपी आणि आशुतोष रांका यांनी या कारवाईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या जोरदार घोषणा देताना दिसत असून, पोलीस बळाचा वापर करून या तरुणांची धरपकड करत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये नेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अभिजीत दिपकेंचा घणाघात
आपल्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. “नरेंद्र मोदी आंदोलन आणि जनतेच्या रोषाला घाबरले आहेत; म्हणूनच त्यांनी आंदोलनाच्या अधिकृत ठिकाणांच्या यादीतून जंतर-मंतरचे नाव घाईघाईने हटवले आहे. त्यांना वाटत असेल की असे केल्याने जंतर-मंतरवरील आंदोलन थांबेल, परंतु त्यांचा हा गैरसमज आहे. आंदोलन इथे बंद होणार नाही,” असा इशारा दिपकेंनी दिला.




