“पोलिसांनी मला अटक नाही, किडनॅप केलं!”; सुटकेनंतर ध्रुव राठीचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी शनिवारी सकाळी घरातून ताब्यात घेण्यात आलेला प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याची आज पोलिसांनी सुटका केली आहे. सुटकेनंतर ध्रुव राठीने एक सविस्तर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आपल्याला कायदेशीररीत्या ताब्यात न घेता गुन्हेगारासारखे घरातून ‘किडनॅप’ (अपहरण) केले, असा खळबळजनक दावा त्याने केला आहे. तसेच, आपला भारतीय पासपोर्ट कॅमेऱ्यासमोर दाखवत, आपण परदेशी नागरिक असल्याचा दावा करणाऱ्या माध्यमांनाही त्याने खडे बोल सुनावले आहेत.
व्हिडीओच्या सुरुवातीलाच स्वतःचा भारतीय पासपोर्ट दाखवत ध्रुव राठी म्हणाला, “मी भारतीय नागरिक आहे, होतो आणि पुढेही राहीन. मीडियाने मी परदेशी नागरिक असल्याचा आणि मला भारतात आंदोलनाचा हक्क नसल्याचा खोटा प्रचार केला. एका सामान्य भारतीय नागरिकाला राज्यघटनेने जेवढे अधिकार दिले आहेत, तेवढेच अधिकार मलाही आहेत.”
हेही वाचा
भाजपचे ४ प्रमुख नेते वेगळा निर्णय घेणार, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
१० ऑक्टोबरच्या पहाटे घडलेल्या थरारक प्रसंगाचे वर्णन करताना तो म्हणाला, “सकाळी ७ वाजता मी बेडरुममध्ये झोपलो होतो. आईने घराचा दरवाजा उघडताच साध्या वेशातील माणसांनी तिला धक्का मारून आत प्रवेश केला. ती ओरडली, पण ते थेट माझ्या बेडरूममध्ये घुसले. मला काही समजायच्या आतच त्यांनी मला फरफटत नेले. घराबाहेर ५० हून अधिक पोलीस व तपास यंत्रणांचे लोक उभे होते. मला पायात चप्पलही घालू दिली नाही आणि एखाद्या सराईत गुन्हेगारासारखे जीपमध्ये कोंबले. जर ही कायदेशीर अटक असती तर मी स्वतःहून गेलो असतो, पण हे सरळसरळ अपहरण होते.”
२० तास बेकायदा कोठडी, फोन जप्त आणि नजरकैद
आपल्याला एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात फिरवण्यात आल्याचे सांगत त्याने म्हटले, “माझा तसेच आई-वडिलांचा फोन काढून घेण्यात आला. २० तास मला डांबून ठेवण्यात आले आणि वकिलांशीही संपर्क साधू दिला नाही. कोणत्याही नागरिकाने कायदा मोडलेला नसताना त्याला घरातून अशा प्रकारे उचलणे लोकशाहीत कधी घडले आहे का? मोदींनी देशात उघड हुकूमशाही सुरू केली आहे. अजूनही माझ्या घरावर १५ जणांचा पहारा असून मला अघोषित नजरकैदेत (House Arrest) ठेवण्यात आले आहे. मात्र, हुकूमशाहीच्या इतिहासात अखेर प्रत्येक हुकूमशाहाचा असाच अंत होतो हे त्यांनी लक्षात ठेवावे,” असा सज्जड इशाराही त्याने दिला.




