पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

तळेगाव दाभाडे | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉच्या एलएल.बी. आणि बी.ए. एलएल.बी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. प्रसन्नता रामतिर्थे, सहाय्यक प्राध्यापक, स्कूल ऑफ लॉ यांच्या मार्गदर्शनाखाली १० ऑक्टोबर २०२६ रोजी नवीन समर्थ कॉलेज ऑफ सायन्स, तळेगाव दाभाडे येथे इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे, वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी आवश्यक माहिती देणे आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे, सायबर छळ, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देणे आणि सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करणे यांमधील संभाव्य धोक्यांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
हेही वाचा
“पोलिसांनी मला अटक नाही, किडनॅप केलं!”; सुटकेनंतर ध्रुव राठीचा गंभीर आरोप
तसेच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी घ्यावयाची खबरदारी, सायबर कायद्यांचे महत्त्व आणि ऑनलाइन फसवणूक झाल्यास उपलब्ध असलेले कायदेशीर उपाय यांविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील डिजिटल सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत जबाबदार डिजिटल नागरिकत्वाचा संदेश दिला.
या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे आणि मुख्य कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. तसेच स्कूल ऑफ लॉचे प्रमुख डॉ. आशिष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. प्रसन्नता रामतिर्थे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल गोपनीयता आणि कायदेशीर जागरूकता वाढविण्यास मदत झाली. समाजाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
सजग राहा, सुरक्षित राहा; सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करा!
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




