TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत CJP आंदोलनावरून तणाव; शिवसैनिकांच्या सुटकेसाठी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे रस्त्यावर

शिवसेना भवनाबाहेर पोलिसांशी बाचाबाची; पोलिसांची गाडी अडवत आदित्य ठाकरेंची भूमिका, युवा सेनेच्या आंदोलनामुळे दादरमध्ये बंदोबस्त वाढवला

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील दादर येथे युवा सेनेकडून आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने शिवसेना भवनाबाहेर तणाव निर्माण झाला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना सोडवण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे रस्त्यावर उतरले.

शिवसेना भवनाबाहेर गोंधळ

दादर येथील शिवसेना भवनाबाहेर CJP आंदोलनाच्या समर्थनार्थ युवा सेनेकडून आंदोलन करण्यात येणार होते. यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा होत होते. त्याचवेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावरून शिवसैनिकांनी आक्षेप घेत पोलिसांनी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या घटनेनंतर परिसरात गोंधळ आणि बाचाबाची झाली.

घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.

आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे रस्त्यावर

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी हस्तक्षेप केला. आदित्य ठाकरे यांनी पोलिसांची गाडी अडवली. शिवसैनिकांना सोडण्यात येईपर्यंत पोलिसांची गाडी जाऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. या घडामोडींमुळे दादरमधील राजकीय वातावरण अधिक तापले.

हेही वाचा –  राजमाता जिजाऊ कॉलेज ठरले आंतरमहाविद्यालयीन व्हॉलिबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद विजेते!

‘शिवसेना भवनात येऊ नका’; महेश सावंत यांचा इशारा

आमदार महेश सावंत यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला. “शिवसेना भवन ही आमची वैयक्तिक जागा आहे. येथे घुसण्याचा प्रयत्न करू नका,” असे पोलिसांना स्पष्ट सांगितल्याचे त्यांनी म्हटले.

मतदानाचा अधिकार काढून घेतला जात असल्याचा आरोप करत लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असल्याचे सावंत म्हणाले. आंदोलनासाठी आलेल्या व्यक्तींनाच ताब्यात घ्यावे, इतर कारणांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना विनाकारण ताब्यात घेऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

पोलिसांनी शिवसेना भवनात येण्याऐवजी रस्त्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे सांगितल्याचे सावंत यांनी नमूद केले. आदित्य ठाकरे आल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निषेध

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंदोलन होणार असल्याचे महेश सावंत यांनी सांगितले. देशात हुकूमशाही सुरू असल्याची टीका करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या या विधानांमुळे CJP आंदोलनाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे.

शिवसेना भवनाबाहेरील घडामोडींमुळे दादर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांची कारवाई आणि ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button