महाराष्ट्राच्या बंदर विकासाला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; नितेश राणेंची कृष्णापटणम अदानी पोर्टला भेट
अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्गो हाताळणी आणि खोल पाण्यातील जहाज सुविधांचा घेतला आढावा; महाराष्ट्रासाठी उपयुक्त तंत्रज्ञान राबविण्यावर भर

मुंबई : महाराष्ट्राच्या बंदर विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत बंदर क्षेत्राला जागतिक दर्जाचे बनविण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशातील कृष्णापटणम येथील अदानी पोर्टला भेट देऊन अत्याधुनिक सुविधांची पाहणी केली. कार्गो हाताळणी व्यवस्था, खोल पाण्यातील जहाजांसाठी उपलब्ध सुविधा, पायाभूत व्यवस्था आणि आधुनिक कार्यपद्धतींचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.
कृष्णापटणम बंदरातील महाराष्ट्रासाठी उपयुक्त तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करून त्यातील प्रभावी बाबी राज्यात राबविण्यात येतील. या माध्यमातून महाराष्ट्रातील बंदर विकासाला नवी दिशा मिळेल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला असून राज्यातील बंदर क्षेत्राच्या विकासाची मोठी क्षमता आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम पायाभूत सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या माध्यमातून राज्यातील बंदरे अधिक आधुनिक, सक्षम आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी अशा अभ्यासदौऱ्यांतून मिळणारे अनुभव उपयुक्त ठरणार आहेत. बंदर विकास तसेच जहाजबांधणी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्षम व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व आहे.
भेटीदरम्यान बंदरातील कार्गो हाताळणीची कार्यपद्धती, खोल पाण्यातील जहाजांच्या वाहतुकीसाठीची सुविधा, अत्याधुनिक पायाभूत व्यवस्था आणि दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच बंदर क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी शासनाची भूमिका, मंजुरी प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे मार्ग आणि उद्योगांसमोरील अडचणी दूर करण्याबाबतही चर्चा झाली.
बंदरांच्या माध्यमातून व्यापक आर्थिक विकासाला चालना देणारी सक्षम परिसंस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही यावेळी विचारविनिमय करण्यात आला. महाराष्ट्रातील बंदर क्षेत्रात गुंतवणूक, रोजगार आणि उद्योगवाढीला चालना देण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी कृष्णापटणम पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश पटेल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मुख्य बंदर अधिकारी प्रवीण खरा, कार्यकारी अभियंता मनीष मेटकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.




