Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महिला शेतकरी प्रमाणपत्राला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३७ लाख ९३ हजारांहून अधिक अर्जांची नोंदणी

८९५ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांनंतर ६८ हजार ४३६ महिलांना प्रमाणपत्र; यवतमाळ नोंदणीत आघाडीवर, कृषी विभागाकडून जनजागृतीला वेग

मुंबई : महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाची अधिकृत ओळख मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरातून ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्येक पात्र महिला शेतकरी या उपक्रमाशी जोडली जावी, यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, २०२६’ विधेयक पारित केले आहे. त्यानुसार महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख, समान अधिकार तसेच शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकरी महिला प्रमाणपत्र देण्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.

राज्यातील ८९५ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ६८ हजार ४३६ महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र वितरित केले आहे. ग्रामसभा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत संबंधित शेतकरी महिलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येते. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे.

यवतमाळ नोंदणीत आघाडीवर

अर्जसंख्येत यवतमाळ जिल्हा आघाडीवर असून, तेथून २ लाख ५३ हजार ४३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापाठोपाठ सातारा २ लाख १४ हजार ७८७, नाशिक २ लाख १० हजार ३२७, अमरावती २ लाख ५ हजार ७४ आणि पुणे १ लाख ७३ हजार ४९ अर्जांसह आघाडीवर आहेत.

बुलढाणा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, नांदेड, धाराशिव, धुळे, बीड आणि जालना या जिल्ह्यांतूनही एक लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तालुकानिहाय नोंदणीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुका आघाडीवर असून, येथे ३५ हजार ४२२ नोंदणी झाली आहे.

कमी नोंदणी असलेल्या भागांत जनजागृती

कृषी विभागामार्फत जिल्हा आणि तालुकानिहाय नोंदणीचे सातत्याने संनियंत्रण केले जात आहे. ज्या भागांत नोंदणीचे प्रमाण कमी आहे, तेथे विशेष जनजागृती करून नोंदणीला गती देण्यात येत असल्याची माहिती कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली.

‘सेवा संकल्प अभियानात’ कृषी विभागाची आघाडी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी ‘सेवा संकल्प अभियान’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला.

या अभियानात विविध शासकीय विभागांच्या तुलनेत कृषी विभागात सर्वाधिक नोंदणी झाली असून, महिला शेतकऱ्यांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. हा सहभाग महिला शेतकऱ्यांचा शासनाच्या योजनांबाबत वाढता विश्वास आणि सक्रिय सहभाग दर्शविणारा असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. उर्वरित पात्र महिला शेतकऱ्यांनीही लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button