अक्कलकुवा-अक्राणीतील पाणीपुरवठ्याला गती; प्रलंबित योजना तातडीने पूर्ण करण्याचे गुलाबराव पाटलांचे निर्देश

८० ते ८५ टक्के पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्य; ५९४ वंचित वस्त्यांसाठी विशेष उपाययोजना, दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील नागरिकांना शाश्वत व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर, जलसाठवण, जलशुद्धीकरण आणि वितरण व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
अक्कलकुवा-अक्राणीतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध जलस्रोत, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची प्रगती तसेच पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी आवश्यक उपाययोजनांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार आमश्या पाडवी, अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटिया, दीपाली देशपांडे-सावेडकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अक्कलकुवा आणि अक्राणी हे डोंगराळ व दुर्गम भाग असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे जलसाठवण क्षमता मर्यादित असून काही भागांत भूजल पुनर्भरणाचे प्रमाणही कमी आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांमध्ये जलस्रोत, जलसाठवण, जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग व्यवस्था आणि वितरण यंत्रणेचा प्रभावी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.
८० ते ८५ टक्के पूर्ण योजनांना प्राधान्य
पाणीपुरवठ्याची कामे वेगाने पूर्ण करण्यावर मंत्री पाटील यांनी विशेष भर दिला. ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्य देऊन उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. अनेक योजनांमध्ये केवळ किरकोळ स्वरूपाची कामे शिल्लक असून ती विलंब न करता पूर्ण केल्यास संबंधित नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळेल. तसेच टँकरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई
पाणीपुरवठा योजनांची कामे विहित वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर विनाविलंब कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले. आवश्यकता भासल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. योजनांची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
५९४ वसाहतींसाठी विशेष उपाययोजना
प्रस्तावित प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील वंचित व दुर्गम वस्त्यांचा प्राधान्याने समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कमी पाणी देणाऱ्या जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या ५९४ वसाहतींसाठी विशेष उपाययोजना आखण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. वंचित वस्त्यांनाही सुरक्षित आणि शाश्वत पाणीपुरवठ्याच्या कक्षेत आणण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.




