स्पाईन रोडवरील बेकायदेशीर कंटेनर पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
नो-पार्किंग झोनमध्ये जड वाहनांवर नियमित कारवाई होणार; डॉ. सुहास कांबळे यांच्या पाठपुराव्याला पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मोशी प्राधिकरणातील स्पाईन रोडच्या सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क करण्यात येणाऱ्या कंटेनर, ट्रेलर आणि अन्य जड-अवजड वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सेक्टर क्रमांक ११ व १३ मधील सरदार चौक ते राजमाता जिजाऊनगर क्रांती चौक परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात त्यांनी फेब्रुवारी २०२६ पासून सातत्याने पाठपुरावा केला असून, नुकतीच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांची भेट घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली.
स्पाईन रोडच्या सेवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर गृहरचना संस्था असल्याने या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, सेवा रस्त्यावर कंटेनर आणि ट्रेलर उभे केले जात असल्यामुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होते. परिणामी वाहतूक कोंडी तसेच अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
डॉ. कांबळे यांनी यापूर्वी १६ सप्टेंबर २०२६ रोजी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार करून स्पाईन रोडच्या सेवा रस्त्यावर होणारे अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किंग तातडीने हटविण्याची मागणी केली होती. या पार्किंगमुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहनचालक, स्थानिक नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना त्याचा त्रास होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.
स्कूल बस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांच्या मार्गात अडथळा
संबंधित परिसरात स्कूल बस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मार्ग मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी बाब डॉ. कांबळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे केवळ वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न म्हणून नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब म्हणून या समस्येकडे पाहण्याची मागणी त्यांनी केली आहे.
डॉ. कांबळे यांचा सातत्याने पाठपुरावा; हाईट बॅरियर्सची मागणी
पोलिसांकडून कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात नो-पार्किंग झोनमध्ये मोठे ट्रक, कंटेनर आणि ट्रेलर पुन्हा पार्क होत असल्याची बाब डॉ. सुहास कांबळे यांनी वाहतूक विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. नो-पार्किंग झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करून उभ्या केल्या जाणाऱ्या जड-अवजड वाहनांवर प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करण्यासोबतच, संबंधित सेवा रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी हाईट बॅरियर्स (उंची प्रतिबंधक कमानी) बसविण्याची मागणीही डॉ. कांबळे यांनी केली. त्यामुळे मोठ्या उंचीच्या कंटेनर, ट्रेलर व जड वाहनांना सेवा रस्त्यावर प्रवेश करून अनधिकृतपणे पार्किंग करण्यास प्रतिबंध होण्यास मदत होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी या समस्येबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘शिवसेनेने शिक्षक मतदारसंघात उमेदवार दिला, मग आम्ही का नाही?’; प्रफुल पटेल यांचा सवाल

पोलिस विभागाकडून नो-पार्किंगची अधिसूचना
डॉ. कांबळे यांच्या तक्रारीवर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे यांनी अहवाल दिला आहे. त्यानुसार, सरदार चौक ते राजमाता जिजाऊनगर क्रांती चौक परिसरात कंटेनर, ट्रेलर यांसारखी जड-अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर पार्क होत असल्याची बाब यापूर्वीच वाहतूक विभागाच्या निदर्शनास आली होती. या पार्श्वभूमीवर सेक्टर क्रमांक ११ व १३ मधील स्पाईन रोडलगत दोन्ही बाजूंना तसेच क्रांती चौक परिसरात नो-पार्किंग झोन घोषित करण्याबाबत वाहतूक विभागाने यापूर्वीच पत्रव्यवहार केला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, जाधव सरकार चौक (सयाजी हॉटेल) ते संतनगर चौकादरम्यानच्या येणे-जाण्याच्या सेवा मार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांसाठी नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. तसेच राजमाता जिजाऊ चौक अर्थात क्रांती चौकाच्या चारही बाजूंना ५० मीटर अंतरात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो-पार्किंगची अधिसूचना लागू करण्यात आली आहे.
नो-पार्किंगचे फलकही बसविण्यात आले
सेवा रस्त्यावर पार्किंगमुळे वाहतूक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संबंधित ठिकाणी नो-पार्किंगचे साइन बोर्ड बसविण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
याशिवाय सार्वजनिक रस्त्याच्या कडेला वाहन पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत दररोज एका वाहतूक अंमलदाराची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नो-पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या वाहनांवर नियमितपणे मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार वाहतूक नियमनासाठी वाहतूक अंमलदार आणि वॉर्डनची नियुक्ती केली जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“स्पाईन रोडवरील सेवा रस्ता हा स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे नो-पार्किंग झोन घोषित करून केवळ फलक लावणे पुरेसे नसून, त्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अनधिकृतपणे पार्क होणाऱ्या कंटेनर व जड वाहनांवर नियमित कारवाई करण्याबरोबरच भविष्यात अशा प्रकारचे पार्किंग पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी हाईट बॅरियर्स बसविणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.”
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका




