‘एपीआयच्या मालकीची मर्सिडीज? सीपींसाठी चिंतेची बाब’; सचिन वाझेंच्या जामीन सुनावणीत हायकोर्टाची टिप्पणी
९० हजार रुपये मासिक पगाराची माहिती; BMW, Mercedesसह पाच महागड्या गाड्यांचा उल्लेख, जामिनावरील NIAच्या याचिकेवर सुनावणी

मुंबई : बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या आर्थिक व्यवहार आणि महागड्या वाहनांच्या मालकीबाबत प्रश्न उपस्थित केले. “त्यांचा मासिक पगार किती असेल? एपीआयच्या मालकीची मर्सिडीज आहे? एखाद्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या मालकीची मर्सिडीज असणे ही पोलीस कमिशनरसाठी चिंतेची बाब असायला हवी,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी वाझेच्या जामीन प्रकरणावर सुमारे तीन तास सुनावणी झाली. वाझे हा अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी असून, सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहे.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी वाझेच्या मासिक पगाराबाबत विचारणा केली. त्यावर वकिलांनी त्यांना सध्या दरमहा सुमारे ९० हजार रुपये पगार मिळत असल्याची माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने एका साक्षीदाराच्या जबाबाचा संदर्भ देत वाझे मर्सिडीजमधून पोलीस आयुक्त कार्यालयात येत असल्याचे तसेच वर्षा बंगल्यावर जात असल्याचे नमूद केले.
हेही वाचा – ‘शिवसेनेने शिक्षक मतदारसंघात उमेदवार दिला, मग आम्ही का नाही?’; प्रफुल पटेल यांचा सवाल
वाझेच्या मालकीच्या वाहनांबाबतही सुनावणीदरम्यान चर्चा झाली. त्याच्याकडे BMW आणि Mercedesसह एकूण पाच महागड्या गाड्या असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती नीला गोखले यांनी वाझेच्या मालकीच्या वाहनांची यादी वाचून दाखवल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, विशेष NIA न्यायालयाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी सचिन वाझेला काही अटींसह जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. NIAच्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने वाझेच्या जामिनाला अंतरिम स्थगिती दिली होती.
आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वाझेच्या वाहनांची मालकी, आर्थिक स्थिती आणि साक्षीदारांच्या जबाबातील उल्लेख यावर न्यायालयात चर्चा झाली. पुढील सुनावणीत या प्रकरणातील विविध मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे.




