Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सोलापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री जयकुमार गोरेंची ग्वाही; ‘पंचनामे पूर्ण करून लवकरात लवकर मदत मिळवून देणार’

सर्व ११ तालुक्यांत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू; कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, प्रशासनाला सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यातील तुळशी येथील शेतकरी आणि ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही गोरे यांनी दिली.

महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्राची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

‘पंचनामे अचूक आणि पारदर्शक पद्धतीने करा’

पंचनाम्यांची कार्यवाही अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे जयकुमार गोरे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने पंचनाम्यांना वेग दिला आहे. प्रत्यक्ष बांधावर जाऊन नोंदणी, जिओ-टॅगिंग आणि संयुक्त पंचनामे करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

हेही वाचा –  बीडच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पंकजा मुंडे; ‘दिवाळी गोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध’

तुळशीतील शेतकऱ्यांची चारा डेपोची मागणी

तुळशी गावातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. या मागणीची दखल घेत चारा डेपो सुरू करण्याचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे गोरे यांनी सांगितले.

तुळशीसह परिसरात पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर झाला आहे. गावाला पिण्याचे आणि शेतीचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जानेवारीपर्यंत उपाययोजना करण्याचे आश्वासन गोरे यांनी रविवारी दिले. तुळशीसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र योजना आणि सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली.

पाणीटंचाई आणि दुष्काळाची तीव्रता वाढली

पावसाअभावी सोलापूर जिल्ह्यातील शेतीसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तुळशी परिसरातील शेतकऱ्यांनी पीक नुकसान, पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा आणि चारा डेपोबाबतच्या अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन जयकुमार गोरे यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button