TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ६ ऑक्टोबरला राज्यव्यापी संप

शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, पेन्शन-ग्रॅच्युइटीसह प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने ६ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर दुपारी २ वाजता अंगणवाडी कर्मचारी शक्तिप्रदर्शन आणि ‘जेल भरो’ आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे चिटणीस राजेश सिंह यांनी दिली.

राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी केंद्रे असून, त्यामध्ये सुमारे २ लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार, अनौपचारिक शिक्षण तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना आहार व आरोग्यविषयक सेवांचा लाभ देण्याचे महत्त्वाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केले जाते.

याशिवाय निवडणूकविषयक कामे, मातृवंदना योजना, लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना, घरकुल योजना आणि दिव्यांग बालकांचे सर्वेक्षण यांसारखी विविध कामेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गेल्या ५१ वर्षांपासून तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत विविध योजनांचे लाभ पोहोचविण्याचे काम करूनही त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात आलेला नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.

हेही वाचा –  निवडणूक आयुक्तांच्या मुद्द्यावरून दिल्लीतील आंदोलन चिघळलं; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत अनेकदा बैठका झाल्या असल्या तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीबाबत अद्याप ठोस आदेश जारी करण्यात आले नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.

तसेच ४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार कामाच्या स्वरूपानुसार प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश असतानाही सुमारे ४० टक्के अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्याप हा भत्ता मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रोत्साहन भत्ता मानधनात समाविष्ट करून दरमहा देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत, अशी संघटनेची मागणी आहे. या सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी एकदिवसीय संपावर जाणार असून, त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन आणि ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button