“ज्ञानू गेला नाही तर नरूभाईंना राजीनामा द्यावा लागेल”; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबईत ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) नेतृत्वाखाली विराट ‘तिरंगा मोर्चा’ काढण्यात आला आहे. मेट्रो सिनेमा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय (BMC) दरम्यान निघालेल्या या मोर्चात महाविकास आघाडीसह मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस, शेकाप हे पक्ष सहभागी झाले आहेत. या आंदोलनादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला असून, “ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल,” असा इशारा दिला आहे.
खासदार संजय राऊत काय म्हणाले?
आज मोर्चासाठी लोक ट्रेनने येत आहेत, चालत आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी हे आंदोलन आहे. देशभरात या आंदोलनाचा प्रभाव आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा हा मोर्चा निघतो आहे. डाव्या आघाडीचे नेतेही मोर्चात येत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देशाला संबोधित करतील. संविधान वाचवा या मोहिमेचं, आंदोलनाचा केंद्रबिंदू हा दिल्लीसह मुंबईतही असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
CBIचे माजी अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश
ज्ञानेश कुमार हाच भाजपाचा बीएलओ आहे. ज्ञानेश कुमार त्यांचं सर्वस्व आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने देश लुटला जातो आहे. त्यामुळे आमचा मोर्चा हा ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आहे.भाजपाने निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांची वकिली करू नये. ते भ्रष्टाचाऱ्यांची आणि देशद्रोह्यांची वकिली करत आहेत. लोकांमध्ये आता खदखद निर्माण झाली आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आम्ही जे म्हणत आहोत ते इंडियन एक्स्प्रेसने छापलं आहे. जनमताच्या रेट्यामुळे भले भले हुकुमशहा यांचा अस्त झाला. जर ज्ञानु गेला नाही तर नरूभाई जाईल, त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आता ठिणगी पडल्यानंतर जनमताचा वणवा पेटला आहे. या वणव्यात सत्ताधाऱ्यांनाही जावं लागेल हे कुणी विसरू नये, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.




