पुणे पदवीधर-शिक्षकच्या जागांवर महायुतीत रस्सीखेच; फडणवीस-शिंदे-सुनेत्रा पवारांची बैठक
भाजपचा दोन्ही जागांवर दावा; शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवारीसाठी आग्रह, आजच्या बैठकीकडे लक्ष

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. पाच जागांसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू असून, विशेषतः पुण्याच्या दोन जागांवर निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, ६ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी पदवीधर, तर अमरावती आणि पुणे येथे शिक्षक मतदारसंघाच्या जागा आहेत. या जागांपैकी कोणती जागा कोणत्या पक्षाला द्यायची आणि कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार असेल, याबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – युवकांनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेत कौशल्ये विकसित करावीत; मंगल प्रभात लोढांचा तरुणांना सल्ला
पुण्याच्या दोन जागांवर तिढा
पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या दोन्ही मतदारसंघांवर महायुतीतील घटक पक्षांकडून दावे करण्यात येत आहेत. भाजपकडून दोन्ही जागांवर दावा करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागा परंपरेने भाजपच्या असल्याचे सांगितले असून, दोन्ही जागांबाबत पक्षाचा दावा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील दावेदारी महत्त्वाची ठरत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठीही महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवरून चुरस असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भैय्या ऊर्फ प्रशांत माने यांच्या नावाची घोषणा झाल्याचे वृत्त आहे, तर भाजपकडूनही अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठीही दावा करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. भाऊसाहेब आंधळकर हे या मतदारसंघातून इच्छुक असून, त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही जागांवर उमेदवारांबाबत निर्णय लवकरच होईल, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या चर्चेनंतर महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुण्याच्या दोन्ही जागांवर महायुतीतील कोणत्या घटक पक्षाला संधी मिळते आणि अंतिम उमेदवार कोण असतील, याकडे आता लक्ष लागले आहे.





