TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘माझ्या डॅडला न्याय द्या’; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळीबारानंतर धारदार शस्त्राने हत्या; ‘हत्येमागे कोण आहे, ते स्पष्ट करा’ अशी कुटुंबीयांची मागणी

ठाणे : ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय वैमनस्य आणि वैयक्तिक कारणांसह विविध शक्यता तपासल्या जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाने या प्रकरणात आरोपींना तातडीने अटक करून कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. “माझ्या डॅडला न्याय द्या. जे कोणी यामागे आहेत, त्या सर्वांना अटक करा. काहीही असेल तरी आम्हाला सर्व क्लियर करा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘हत्येमागचं कारण माहित नाही’

आपल्या वडिलांच्या हत्येमागे नेमके कारण काय आहे, याची आपल्याला कल्पना नसल्याचे पूर्णेकर यांच्या मुलाने सांगितले. निवडणूक, पक्षीय कारण किंवा अन्य कोणत्या कारणातून ही हत्या झाली, हे स्पष्ट नसल्याचे त्यांनी म्हटले.

“खूप वेळा माझ्या वडिलांनी सर्वांसाठी सर्व काही केलं. दुसऱ्यांची नशा सोडवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. ड्रग माफिया या हत्येमागे असू शकतो, कोणीही असू शकतो,” असा संशय त्यांनी व्यक्त केला. मात्र, हा कुटुंबीयांनी व्यक्त केलेला संशय असून त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा –  पुणे पदवीधर-शिक्षकच्या जागांवर महायुतीत रस्सीखेच; फडणवीस-शिंदे-सुनेत्रा पवारांची बैठक

‘पप्पा कलेक्टर ऑफिसला जाणार होते’

घटनेच्या दिवशी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाचाही पूर्णेकर यांच्या मुलाने उल्लेख केला. त्यांचे वडील कलेक्टर कार्यालयात जाणार होते; मात्र पोलिसांनी त्यांना समजावल्याने ते दुपारी घरीच होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

‘उपमुख्यमंत्र्यांनीही मदत करावी’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागणी करणार, असा प्रश्न विचारला असता पूर्णेकर यांच्या मुलाने आरोपींना अटक करून संपूर्ण प्रकरण स्पष्ट करण्याची मागणी केली.

“मला सीएम सरांना एवढंच सांगायचं आहे की, प्लीज माझ्या डॅडला न्याय द्या. जे कोणी यामागे आहेत, त्या सर्वांना अटक करा. आमची फॅमिली कधी इतक्या घाण परिस्थितीतून गेलेली नाही. आम्हाला काय त्रास होतोय, आम्हाला माहिती आहे,” असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा फोन आला आहे का, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. “माझे वडील निष्ठावंत होते, हे सर्वांना माहिती आहे,” असेही त्यांनी म्हटले.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही मदतीची अपेक्षा असल्याचे पूर्णेकर यांच्या मुलाने सांगितले. “उपमुख्यमंत्र्यांनीही काहीतरी बोललं पाहिजे. आम्हाला त्यांच्या मदतीची गरज आहे,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पोलिसांच्या तपासातून हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे. सध्या हत्येचा हेतू अधिकृतरीत्या निश्चित झालेला नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button