ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये शासकीय ‘एमबीबीएस’ महाविद्यालय सुरू करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार महेश लांडगे यांचे पत्र

– वायसीएम रुग्णालयाशी संलग्न महाविद्यालयासाठी कालबद्ध प्रस्तावाची मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

शहरात शासकीय अथवा महापालिकेचे एमबीबीएस महाविद्यालय सुरू करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. वायसीएम रुग्णालयाशी संलग्न महाविद्यालयाला तत्त्वतः मान्यता देऊन त्यासाठी जागा, निधी आणि मनुष्यबळाचा सविस्तर प्रस्ताव निश्चित मुदतीत मागवावा, असे साकडे त्यांनी घातले आहे.

पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या सुमारे ४० लाखांपर्यंत पोहोचली असताना शहरात सरकारी किंवा महापालिकेचे एमबीबीएस महाविद्यालय नसल्याचा मुद्दा लांडगे यांनी उपस्थित केला आहे. वायसीएम रुग्णालयाशी संलग्न संस्थेत एमडी आणि एमएस पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहेत; मात्र एमबीबीएससाठी स्थानिक विद्यार्थ्यांना पुणे, इतर जिल्हे किंवा खासगी संस्थांकडे जावे लागते, असे पत्रात नमूद आहे.

खासगी वैद्यकीय शिक्षणाचा वाढता खर्च मध्यमवर्गीय कुटुंबांना पेलणे कठीण होत असल्याचे लांडगे यांनी म्हटले आहे. पत्रात दिलेल्या अंदाजानुसार, काही खासगी संस्थांमध्ये साडेचार वर्षांचे शिक्षण शुल्क, निवास आणि इतर शुल्क मिळून एमबीबीएसचा खर्च सुमारे ₹१.४८ कोटी होऊ शकतो. हा सर्व महाविद्यालयांना लागू असलेला दर नसून पत्रातील खर्चाचा अंदाज आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्देशानुसार एमबीबीएसचे शिक्षण शुल्क साडेचार वर्षांच्या शैक्षणिक कालावधीपुरतेच आकारायचे आहे.

हेही वाचा –  कामगारांना न्याय देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

महाविद्यालयासाठी महापालिकेचा ठोस प्रस्ताव अद्याप तयार झालेला नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचेही लांडगे यांनी पत्रात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, नगरविकास विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी त्यांची मागणी आहे. जागा, आर्थिक तरतूद, आवश्यक मनुष्यबळ आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषांचा समावेश असलेला प्रस्ताव प्रशासनाने निश्चित कालमर्यादेत सादर करावा; त्यानंतर राज्य शासनाने मान्यता व निधीबाबत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सुचवले आहे.

गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांना परवडणारे वैद्यकीय शिक्षण उपलब्ध व्हावे आणि शहराच्या वाढत्या आरोग्यसेवेसाठी डॉक्टर घडावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालावे, अशी विनंती लांडगे यांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपरी-चिंचवडमधील गुणवंत विद्यार्थ्यांना एमबीबीएस शिक्षणासाठी शहराबाहेर जावे लागते किंवा खासगी महाविद्यालयांचा मोठा खर्च करावा लागतो. वायसीएम रुग्णालयाशी संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि शहराच्या आरोग्यसेवेलाही बळ मिळेल. यासाठी राज्य शासनाने महापालिकेकडून कालबद्ध प्रस्ताव मागवून निर्णय घ्यावा. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.”

— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button