TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जरांगेंची डिफेंडर गाडी सोलापुरात दाखल होताच अनोखं स्वागत; गाडीच्या सीटचंही औक्षण

संगममध्ये मराठा बांधवांकडून फुलांचा वर्षाव आणि पूजा; गाडी पाहण्यासाठी मोठी गर्दी, समर्थकांचा भावनिक जिव्हाळा

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वापरातील डिफेंडर गाडी पुन्हा चर्चेत आली आहे. जरांगे पाटील यांनी ही गाडी मूळ मालकाकडे परत केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील संगम येथे मराठा बांधव आणि महिलांनी गाडीचे अनोखे स्वागत केले. गाडीचे औक्षण करण्याबरोबरच जरांगे पाटील ज्या आसनावर बसले होते, त्या आसनाचेही औक्षण करण्यात आले.

डिफेंडर गाडी संगम येथे दाखल होताच ती पाहण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी झाली. काहींनी गाडीला स्पर्श केला, फुले वाहिली आणि फोटो काढले. या स्वागतामधून जरांगे पाटील यांच्याबद्दल त्यांच्या समर्थकांमध्ये असलेला भावनिक जिव्हाळा दिसून आला.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमध्ये शासकीय ‘एमबीबीएस’ महाविद्यालय सुरू करा!

डिफेंडर गाडीवरून आधी झाली होती चर्चा

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील डिफेंडर गाडीतून प्रवास करत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर या गाडीची मोठी चर्चा झाली होती. ही गाडी आपली नसून एका समाजबांधवाने वापरण्यासाठी दिल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.

या गाडीचे मालक सुभाष भोसले हे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील असल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. भोसले यांनी ही गाडी जरांगे पाटील यांना वापरण्यासाठी दिल्याचेही सांगितले होते.

दरम्यान, डिफेंडर गाडीवरून टीका सुरू झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी अखेर ती परत करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीत पोहोचल्यावर त्यांनी गाडीच्या मालकाला ती परत घेऊन जाण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सुभाष भोसले यांनी गाडी परत नेली.

गाडी परत केल्यानंतर आता संगममध्ये तिचे झालेल्या अनोख्या स्वागतामुळे डिफेंडर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button