अरबी समुद्रात तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला; तीन हजार कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त
तटरक्षक दल–गुजरात एटीएसची संयुक्त कारवाई; ५२६ किलो हेरॉईन व मेथॅम्फेटामाइनसह पाच पाकिस्तानी नागरिक ताब्यात

मुंबई: भारतीय तटरक्षक दलाने गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) समन्वयाने लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात अमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावला. एका इराणी नौकेतून सुमारे ५२६ किलो हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले असून, त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत तीन हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे तटरक्षक दलाने सांगितले. नौकेवरील पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्तचर माहितीच्या आधारे तटरक्षक दलाने समुद्र आणि हवाई मार्गाने निगराणी सुरू केली होती. संशयास्पद नौकेच्या हालचालींचा मागोवा घेतल्यानंतर पाठलाग करून ती अडवण्यात आली. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या या कारवाईत नौकेवर प्रवेश करून तपासणी करण्यात आली असता हेरॉईन आणि उच्च दर्जाचे मेथॅम्फेटामाइन आढळले, अशी माहिती तटरक्षक दलाच्या निवेदनातून देण्यात आली.
हेही वाचा – जरांगेंची डिफेंडर गाडी सोलापुरात दाखल होताच अनोखं स्वागत; गाडीच्या सीटचंही औक्षण

जप्त नौका, ताब्यात घेतलेले पाच संशयित आणि अमली पदार्थांचा साठा सशस्त्र सुरक्षेत मुंबईला आणण्यात आला आहे. संयुक्त चौकशी आणि विविध यंत्रणांमार्फत पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणातील अमली पदार्थांचा साठा समुद्रातच पकडण्यात आल्याने तस्करीच्या या प्रयत्नाला धक्का बसला आहे. मात्र, या प्रकरणातील संपूर्ण तस्करी जाळ्याचा उलगडा आणि संबंधितांची भूमिका पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.




