ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

परंपरेचा मान, समाजहिताचा वसा जोपासत थेरगावमधील वनदेव आनंदवन मित्र मंडळाने साजरा केला गणेशोत्सव

मंडळाचे संस्थापक अभिषेक बारणे यांच्या पुढाकारातून डिजे व डॉल्बीला पूर्णपणे फाटा देत शिस्तबद्ध रंगला सोहळा

माता जोगेश्वरी काळभैरवनाथ विवाह सोहळा ठरला आकर्षणाचे केंद्रबिंदू; हजारो भाविकांच्या साक्षीने गणपती बाप्पाला दिला निरोप

पिंपरी | थेरगावमधील वनदेव आनंदवन मित्र मंडळाने यंदाचा गणेशोत्सव एका नव्या आणि स्तुत्य विचाराने साजरा केला. स्थायी समिती सभापती तथा मंडळाचे संस्थापक अभिषेक बारणे यांच्या पुढाकारातून झालेला हा सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.

या भव्य गणेशोत्सव सोहळ्याला प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर, पूर्णिमा डे, स्नेहलता माघाडे, तसेच प्रसिद्ध नृत्यंगना प्रियांका जाधव यांनी हजेरी लावून रंगात वाढवली.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत मंडळाने डिजे व डॉल्बीला पूर्णपणे फाटा दिला. त्याऐवजी संपूर्ण मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडली.

या विसर्जन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या माता जोगेश्वरी आणि काळभैरवनाथ यांच्या विवाह सोहळ्याचा भव्य-दिव्य जिवंत पौराणिक देखावा व विलोभनीय सादरीकरण. हा अनोखा आणि सांस्कृतिक सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी व बाप्पाला निरोप देण्यासाठी परिसरातील तब्बल १५ ते २० हजार नागरिकांनी अलोट गर्दी केली. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

हेही वाचा

नेमबाजीत भारताचा नवा इतिहास! नीरू धांडाने ट्रॅप प्रकारात जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

गणेशोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने “आरोग्याचा श्रीगणेशा” हा विशेष आरोग्य तपासणी उपक्रम राबवण्यात आला. यात बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी, औषधोपचार, तसेच असंसर्गजन्य रोग (एनसीडी) तपासणी व मार्गदर्शन आणि आभा कार्ड व आयुष्मान कार्ड संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. तसेच लहान मुलांसाठी विशेष ‘बालजत्रा’ यांसारखे उपक्रम राबविण्यात आले.

विसर्जनाच्या दिवशी लाखांच्या संख्येने जमणारी गर्दी आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी मंडळाने प्रशासनाच्या सहकार्याने चोख नियोजन केले होते. मिरवणुकीदरम्यान कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत उत्तम पार्किंग व्यवस्था करण्यात आली. ध्वनीप्रदूषण टाळत विशेष जलकुंडांचा वापर करून बाप्पांना अत्यंत भावपूर्ण, शिस्तबद्ध वातावरणात निरोप देण्यात आला.

​“उत्सव मोठा करण्यापेक्षा तो समाजासाठी किती अर्थपूर्ण ठरतो, हे महत्त्वाचे असते,” हा विचार मंडळाचे संस्थापक अभिषेक बारणे यांनी आपल्या कृतीतून खरा करून दाखवला आहे. भक्तीला सामाजिक जाणिवांची जोड आणि परंपरेला संस्कृतीची साथ देत त्यांनी गणेशोत्सवाचे एक नवे रूप शहरासमोर उभे केले असून, थेरगाव येथील हा यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने परंपरेचा मान राखणारा आणि समाजहिताची ज्योत तेवणारा ठरला आहे.

गणेशोत्सव हा केवळ आनंद साजरा करण्याचा सण नसून तो समाजाला जोडण्याचे आणि उत्तम संस्कार रुजवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. आजच्या तरुणांनी आणि मंडळांनी डिजेच्या संस्कृतीतून बाहेर पडून आपल्या समृद्ध परंपरेकडे आणि समाजहिताच्या कार्याकडे वळणे गरजेचे आहे. बाप्पाच्या कृपेने आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा हा स्तुत्य उपक्रम यशस्वी होऊ शकला, याचे आम्हास विशेष समाधान आहे.

– अभिषेक बारणे, संस्थापक – वनदेव आनंदवन मित्र मंडळ, थेरगाव.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button