सायबर फसवणूक रोखण्यासाठी पोलिसांना ‘सायबर वॉरियर्स’चे मार्गदर्शन
टिळकनगर पोलीस ठाण्यात प्रगती महाविद्यालय आणि क्विक हिल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

डोंबिवली : फ्रॉड कॉल, फसवे संदेश आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर टिळकनगर पोलीस ठाण्यात विशेष सायबर सुरक्षा जागरूकता सत्र घेण्यात आले. प्रगती महाविद्यालय आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सत्रात पोलिसांना डिजिटल सुरक्षेच्या उपायांची माहिती देण्यात आली.
प्रगती महाविद्यालयाचे सायबर वॉरियर कनव पाटील यांनी सत्रात मार्गदर्शन केले. त्यांनी अँटीव्हायरस डॉट कॉमसह सायबर सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या विविध ॲप्लिकेशन्सची माहिती दिली. तसेच ‘सायबर वॉरियर्स’ ॲप पोलिसांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ते सक्रिय करण्यात आले. फ्रॉड कॉल, फसवे संदेश आणि पेमेंट स्कॅम्स ओळखण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती आयोजकांनी दिली. ॲप सक्रिय करण्यासाठी ‘०५८’ हा कोड वापरण्याचे आवाहनही करण्यात आले.
या उपक्रमासाठी क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सहसंचालक अजय शिर्के तसेच कनव पाटील आणि पारस पाटील यांनी योगदान दिले. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांना नव्या डिजिटल साधनांची ओळख करून देणारा हा उपक्रम ठरला.




