महाराष्ट्रातील दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल; शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीच्या मागण्या
मागील ₹31 हजार कोटींच्या पॅकेजमधील प्रत्यक्ष मदतीचा हिशोब जाहीर करण्याची मागणी; तालुकानिहाय दुष्काळ जाहीर करण्यासह विशेष अधिवेशन, कर्जमाफी आणि ऑनलाइन डॅशबोर्डची मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या सुमारे 31 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधून प्रत्यक्ष किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, याचा तपशील सरकारने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
हवामान खात्यासह विविध संस्थांनी दुष्काळाची शक्यता व्यक्त केली असतानाही सरकारने पूर्वतयारी केली का, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. सरकारकडून सुरू असलेले दौरे आणि मदतीच्या घोषणांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
उद्धव ठाकरेंच्या प्रमुख मागण्या :
- दुष्काळग्रस्तांसाठी निधी वळवा :
अनावश्यक प्रकल्प, खर्चिक कार्यक्रम आणि जाहिरातबाजीवरील निधी दुष्काळ निवारणासाठी वापरण्याची मागणी त्यांनी केली. तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
- विधिमंडळाचे विशेष अधिवेशन :
दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा – दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट? बच्चू कडूंच्या विधानाने चर्चांना उधाण
- सरसकट कर्जमाफी :
जाचक अटी किंवा कागदपत्रांच्या अडथळ्यांशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. बँकांकडून कर्जासाठी अडथळे निर्माण झाल्यास सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
- तालुकानिहाय दुष्काळ जाहीर करा :
NDRF आणि SDRF निकषांची किंवा इतर प्रक्रियेची प्रतीक्षा न करता ज्या भागात गंभीर परिस्थिती आहे, तेथे तालुकानिहाय दुष्काळ जाहीर करावा, असे ठाकरे यांनी म्हटले.
- पारदर्शक ऑनलाइन डॅशबोर्ड :
दुष्काळ निवारणासाठी स्वतंत्र ऑनलाइन डॅशबोर्ड तयार करून त्यावर बाधित गावे, शेतकरी, पंचनामे, वितरित व प्रलंबित मदत, पाणीटंचाई, टँकर, चारा आणि कर्जमाफीची माहिती दररोज अपडेट करावी, अशी मागणी आहे.
- विभागनिहाय कॅबिनेट बैठका :
सोलापूर, संभाजीनगर आणि विदर्भ या भागांत तातडीने कॅबिनेट बैठका घेऊन स्थानिक दुष्काळी परिस्थितीचा आढावा घ्यावा. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यांत प्रत्यक्ष उपस्थित राहून दुष्काळ निवारणाच्या कामावर लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
- थेट आर्थिक मदत :
केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत शक्य तितक्या लवकर थेट आर्थिक मदत पोहोचवावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
- चारा छावण्या आणि पिण्याचे पाणी :
जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी चिंता विविध नेत्यांकडूनही व्यक्त करण्यात आली आहे.





