Painkillers आणि Antibiotics बाबत मोठा इशारा; अनिर्बंध वापरामुळे किडनीला धोका, CDSCOचे मार्गदर्शन
NSAIDs आणि अँटिबायोटिक्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका; किडनीचा आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन

नवी दिल्ली : वेदनानाशक औषधे (Painkillers) आणि प्रतिजैविके (Antibiotics) यांचा अनिर्बंध किंवा चुकीचा वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. अशा औषधांचा वारंवार किंवा दीर्घकाळ वापर केल्याने दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (Chronic Kidney Disease) होण्याचा धोका वाढू शकतो, तसेच अँटिबायोटिक्सच्या अयोग्य वापरामुळे Antimicrobial Resistance (AMR) ची समस्या गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO)ने डॉक्टर, फार्मासिस्ट, औषध विक्रेते, रुग्णालये आणि नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
CDSCOच्या अधिकृत संकेतस्थळावर २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात NSAIDs म्हणजेच नॉन-स्टेरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी औषधे आणि अँटिबायोटिक्सच्या योग्य, सुरक्षित आणि जबाबदार वापरावर भर देण्यात आला आहे. औषध नियामकाने स्वयंउपचार टाळण्याचे आणि वैद्यकीय देखरेखीखाली औषधांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
पेनकिलरचा वारंवार वापर टाळा
डोकेदुखी, अंगदुखी किंवा इतर किरकोळ त्रासासाठी वारंवार स्वतःहून Painkillers घेण्याची सवय टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः NSAIDs दीर्घकाळ किंवा वारंवार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे CDSCOने स्पष्ट केले आहे. किडनीशी संबंधित आजार किंवा मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम करणारे इतर आरोग्यविषयक धोके असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांना त्याबाबत माहिती देणे महत्त्वाचे आहे.
सर्दी-तापासाठी अँटिबायोटिक्स घेऊ नका
सामान्य व्हायरल इन्फेक्शनमध्ये अनेकदा अँटिबायोटिक्सची आवश्यकता नसते. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा साध्या तापासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स घेणे टाळावे. चुकीच्या वापरामुळे जिवाणूंमध्ये औषधांविरोधात प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. यालाच Antimicrobial Resistance (AMR) म्हटले जाते.
हेही वाचा – दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट? बच्चू कडूंच्या विधानाने चर्चांना उधाण
डॉक्टरांनी दिलेला Antibiotic कोर्स पूर्ण करा
डॉक्टरांनी अँटिबायोटिक लिहून दिल्यास ते त्यांच्या सूचनेनुसारच घ्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाचा डोस बदलू नये, उपचार मध्येच थांबवू नयेत किंवा उरलेली औषधे नंतर स्वतःहून वापरू नयेत. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली अँटिबायोटिक्स इतर व्यक्तींना देऊ नयेत.
औषध विक्रेत्यांनाही सूचना
CDSCOने औषध विक्रेते आणि संबंधित घटकांनी प्रिस्क्रिप्शनच्या नियमांचे पालन करण्यावर भर दिला आहे. Painkillers आणि Antibioticsच्या अयोग्य वापराला आळा घालण्यासाठी डॉक्टर, फार्मासिस्ट, किरकोळ विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांनी जबाबदारीने औषधांचा वापर आणि वितरण सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय Painkillers वारंवार किंवा दीर्घकाळ घेऊ नयेत.
-साध्या व्हायरल संसर्गासाठी स्वतःहून Antibiotics घेऊ नयेत.
-डॉक्टरांनी दिलेली औषधे त्यांच्या सूचनेनुसारच घ्यावीत.
-उरलेली Antibiotics स्वतःहून पुन्हा वापरू नयेत.
-किडनीचा आजार असल्यास Painkillers घेण्यापूर्वी डॉक्टरांना त्याची माहिती द्यावी.
-दुखणे, ताप किंवा इतर लक्षणे वारंवार होत असल्यास स्वयंउपचार करण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घ्यावा.





