TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

Gokul Election: ‘मोठा भाऊ, छोटा भाऊ कोणी नाही’; चंद्रकांत पाटलांचा महायुतीला स्पष्ट संदेश

‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या नावाने निवडणूक लढवणार; गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे पाटलांचे वक्तव्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या निवडणुकीला आता वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय हालचालींनाही वेग आला असून, महायुतीकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीतील घटक पक्ष एकत्र असल्याचे सांगत ‘ही निवडणूक बिनविरोध होणार नाही’, असे स्पष्ट केले.

‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’ या नावाने निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोण मोठा किंवा कोण छोटा, असा प्रश्न नसून सर्व पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील, असे त्यांनी सांगितले.

पाटील यांच्या म्हणण्यानुसार, करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू असून अंतिम चित्र ८ ऑक्टोबरला स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गोकुळ निवडणुकीत महायुतीतील जागावाटपावरून चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. भाजपने २५ही जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले असले, तरी निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढवण्याची भूमिका नेत्यांकडून मांडण्यात आली आहे.

हेही वाचा –  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; डोंबिवलीचा ‘रासरंग’ दांडिया यंदा रद्द

‘एखादा भाऊ हरवला असेल तर त्याने इच्छा सांगावी’

महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिकेबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ‘आम्ही सगळे भाऊ एकत्र आहोत’, असे म्हटले. मात्र, ‘जत्रेमध्ये एखादा भाऊ हरवला असेल, तर त्या भावानेही आपली इच्छा बोलून दाखवावी,’ अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. गोकुळ निवडणुकीतील सर्व निर्णय कोल्हापुरातच घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गोकुळ निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २२ सप्टेंबरपर्यंत ३०१ उमेदवारांनी एकूण ४३६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर पॅनेलची अंतिम रचना स्पष्ट होणार आहे.

गोकुळ निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे :

अर्ज माघारीची मुदत : २५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर

अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : ८ ऑक्टोबर

मतदान : १८ ऑक्टोबर २०२६

मतमोजणी व निकाल : १९ ऑक्टोबर २०२६

गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीनेही मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात उमेदवारी, जागावाटप आणि पॅनेलच्या अंतिम रचनेवरून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आणखी हालचाली होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button