TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद; धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव

पावसाची ३५ टक्के तूट; २४६ टँकर्स सुरू, मांजरा धरणात अवघा १० टक्के साठा; दुष्काळसदृश्य परिस्थितीचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठवणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांसह पाणीटंचाईचे संकट गंभीर होत आहे. विभागात सरासरीच्या तुलनेत सुमारे ३५ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पाणीस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

मराठवाड्यात पावसाची सर्वाधिक तूट लातूर जिल्ह्यात ५० टक्के आहे. त्यापाठोपाठ परभणीमध्ये ४३ टक्के, तर धाराशिव आणि बीडमध्ये प्रत्येकी ४० टक्के तूट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत तुलनेने पाऊस झाला असला, तरी या दोन्ही जिल्ह्यांतही सुमारे २६ टक्के तूट कायम आहे.

पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्याने पावसाळ्यातही मराठवाड्यात २४६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये बीडमध्ये सर्वाधिक १२०, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९६ आणि जालन्यात २२ टँकर्स सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.

विभागातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प तसेच नदीवरील बंधारे मिळून सुमारे ९१७ जलसाठा प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठ्याच्या तुलनेत ५० टक्के तूट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जायकवाडी धरणात काही प्रमाणात समाधानकारक साठा असला, तरी मांजरा धरणातील साठा अवघा १० टक्क्यांवर असल्याने चिंता वाढली आहे.

हेही वाचा –  SIR वादावर राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ येईल तेव्हा तुम्हाला पकडू’

नद्यांमधील वाहते पाणी अडवण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरमध्ये बंद केले जाणारे काही बंधारे यंदा पावसाअभावी जुलै-ऑगस्टमध्येच बंद करण्यात आले आहेत. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा

मराठवाड्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नियमित क्षेत्रभेटी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिकांची सद्यस्थिती, पावसाची स्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेऊन प्राथमिक अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या खरीप पिकांवरही पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागांत सोयाबीनसह अन्य पिके वाळून गेल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात मांडल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईसोबतच पीक नुकसानीचा प्रश्नही प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button