ताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

Cyber Shiksha for Cyber Suraksha : सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांनी सजग राहावे!

श्रीमती राधाबाई साठे स्कूलमध्ये सायबर क्राईम जनजागृती सत्र; ऑनलाइन फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन

डोंबिवली । प्रतिनिधी

विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीमती राधाबाई साठे स्कूल येथे सायबर क्राईम जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमांतर्गत झालेल्या या सत्राला माहिती तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठाणे जिल्हा कृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, डोंबिवली (पूर्व) आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रगती कॉलेजचे विद्यार्थी चैतन्य परब आणि रजक सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

मोबाईल फोनसह GPay आणि FamPay यांसारख्या डिजिटल पेमेंट ॲप्सचा वाढता वापर, तसेच Instagram, YouTube आणि ऑनलाइन गेम्सवरील विद्यार्थ्यांचा वाढता वावर लक्षात घेता सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सत्रात सायबर क्राईम म्हणजे काय, सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात आणि ऑनलाइन धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.

हेही वाचा

ॲड. राजेश उगमसिंग राजपुरोहित यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधिज्ञ पॅनेलवर नियुक्ती

फेक लिंक, फोटो मॉर्फिंग, व्हिडिओ कॉल स्कॅम, OTP फसवणूक, व्हायरस आणि संशयास्पद ऑनलाइन व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP किंवा वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर न करणे, मजबूत पासवर्ड वापरणे आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तत्काळ पालक किंवा शिक्षकांना माहिती देणे, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

हे सत्र अत्यंत संवादात्मक आणि माहितीपूर्ण ठरले. विद्यार्थ्यांनी स्वतःचे अनुभव सांगत विविध प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे दिली. विद्यार्थ्यांची उत्सुकता आणि सक्रिय सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. विद्यालयातील शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सध्याच्या डिजिटल वातावरणात विद्यार्थ्यांना देण्यात आलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक असल्याचे नमूद केले.

या अभियानामध्ये चैतन्य परब आणि रजक सावंत यांनी घेतलेला सक्रिय सहभाग विशेष कौतुकास्पद ठरला. प्रगती कॉलेज आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सायबर धोक्यांची ओळख होण्यासह सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. धनंजय वानखेडे, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख श्रीमती रुपाली पाटील, Quick Heal Foundationच्या अध्यक्षा श्रीमती अनुपमा कटकर, को-डायरेक्टर अजय शिर्के तसेच सक्रिय सदस्य गायत्री केसरकर आणि दिपू सिंग यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शन, समन्वय आणि सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणि नव्या शिकण्याच्या संधी उपलब्ध झाल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group