ॲड. राजेश उगमसिंग राजपुरोहित यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधिज्ञ पॅनेलवर नियुक्ती
फौजदारी, दिवाणी, मालमत्ता आणि सायबर कायद्यातील प्रदीर्घ अनुभवाची दखल; कायदेशीर व न्यायालयीन प्रकरणांत करणार महापालिकेचे प्रतिनिधित्व

पिंपरी-चिंचवड | प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. राजेश उगमसिंग राजपुरोहित यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विधिज्ञ पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे मुख्य विधी सल्लागार ॲड. राजेश आगळे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे अधिकृत नियुक्तिपत्र जारी करण्यात आले आहे.
ॲड. राजपुरोहित यांनी आपल्या कायदेविषयक कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत. कायद्याचा सखोल अभ्यास, न्यायालयातील प्रभावी युक्तिवाद, पक्षकारांची बाजू भक्कमपणे मांडण्याची हातोटी आणि कामाप्रती असलेली निष्ठा यांमुळे त्यांनी विधी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अनुभवाची आणि कामगिरीची दखल घेत महापालिका प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्ती आदेशानुसार, ॲड. राजपुरोहित हे महापालिकेशी संबंधित विविध कायदेशीर व न्यायालयीन प्रकरणांमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची बाजू मांडणार आहेत. ही नियुक्ती त्यांच्या कायदेविषयक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
विधी क्षेत्रासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही ॲड. राजपुरोहित सक्रिय आहेत. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर विधी आघाडीचे माजी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक आणि कायदेविषयक उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर
फौजदारी व दिवाणी प्रकरणे, मालमत्ताविषयक वाद, कौटुंबिक प्रकरणे, धनादेश अनादराची कलम १३८ अंतर्गत प्रकरणे तसेच सायबर कायद्याशी संबंधित विषयांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. खरेदीखत, सामंजस्य करार, बक्षीसपत्र, नोंदणीकृत व नोटरीकृत भाडेकरार, मुखत्यारपत्र, मृत्युपत्र आणि वारस प्रमाणपत्र यांसारख्या दस्तऐवजांबाबतही ते कायदेविषयक सेवा देतात.
यासह जुन्या खरेदीखतांच्या मूळ अथवा प्रमाणित प्रती मिळवणे, विविध प्रकारचे करार, नुकसानभरपाई बंधपत्र, संमतीपत्र, सहकारी संस्था आणि ट्रस्ट नोंदणी, महसूल अपील, माहिती अधिकार अर्ज तसेच ईएसआयसी आणि भविष्य निर्वाह निधीशी संबंधित प्रकरणांमध्येही त्यांना अनुभव आहे.
ॲड. राजेश उगमसिंग राजपुरोहित यांच्या नियुक्तीचे विधी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे. सहकारी, मित्र आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





