उजनीतील मासेमारी ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र पुढील लढाई कायम!
पारंपरिक मच्छीमारांच्या आमरण उपोषणाची प्रशासनाकडून दखल; ठेकेदारीविरोधातील संघर्षात खांद्याला खांदा लावून लढणार : मारुती भापकर

पुणे | प्रतिनिधी
उजनी धरण क्षेत्रातील मासेमारी ठेकेदारी पद्धतीने देण्याच्या निर्णयाला प्रशासनाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाविरोधात आमरण उपोषण करणाऱ्या भोई, कोळी, आदिवासी, भिल्ल आणि फासे पारधी समाजाच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मात्र, भविष्यात राजकीय नेते आणि ठेकेदार संगनमताने ही पद्धत पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांनी कायम जागृत राहून संघर्षासाठी सज्ज राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले आहे.
उजनी धरण क्षेत्रात भोई, कोळी, आदिवासी, भिल्ल आणि फासे पारधी समाजातील अनेक कुटुंबे पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. मात्र, या मासेमारीचे ठेके देऊन संपूर्ण व्यवसाय काही राजकीय मंडळी आणि ठेकेदारांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मच्छीमार समाजाने केला होता. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांच्या रोजगारावर आणि पारंपरिक व्यवसायावर गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
ठेकेदारीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी भोई, कोळी, आदिवासी, भिल्ल आणि फासे पारधी समाजातील महिला व युवकांनी पुण्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन भवन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक चळवळीचे नेते मारुती भापकर यांनी जाहीर पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
हेही वाचा – दिशा सालियान प्रकरणावर संजय राऊत आक्रमक; ‘संयमाचा बांध तुटला तर मी बोलणार’

सरकारने आंदोलकांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर पिंपरी-चिंचवड शहरातील विविध जनचळवळीही या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा भापकर यांनी प्रशासनाला दिला होता. आंदोलनाची तीव्रता आणि मच्छीमार समाजाचा वाढता विरोध लक्षात घेऊन अखेर प्रशासनाने मासेमारी ठेकेदारी प्रक्रियेला स्थगिती दिली. याबाबतचे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आल्यानंतर आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, युवक आणि सर्व मच्छीमार बांधवांचे भापकर यांनी अभिनंदन केले. पारंपरिक मच्छीमारांचा रोजगार, उपजीविका आणि हक्कांचे संरक्षण होईपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“उजनीतील मासेमारी ठेकेदारीला स्थगिती मिळणे हा आंदोलनाचा विजय आहे. मात्र, हा संघर्ष अजून संपलेला नाही. भविष्यात राजकीय नेते आणि ठेकेदार संगनमताने पुन्हा ठेकेदारी पद्धत लागू करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सर्व पारंपरिक मच्छीमार बांधवांनी जागृत राहून संघर्षाची तयारी ठेवावी. त्यांच्या हक्काच्या लढ्यात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहू.”
— मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते





