TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुंबई बनणार जागतिक ज्ञान-नवोपक्रम केंद्र; UWAच्या पहिल्या भारतातील कॅम्पसचे उद्घाटन

एज्युकेशन, इनोव्हेशन आणि रिसर्चला चालना; AI, सायबर सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञानात सहकार्य वाढविण्यावर भर

मुंबई : मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळाच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते UWA इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन झाले. यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक, UWAच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू प्रा. अमित चकमा, विद्यापीठाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

भारतातील पहिला कॅम्पस मुंबईत

ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य संशोधनाधिष्ठित विद्यापीठ असलेल्या UWAने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे फडणवीस म्हणाले. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘ग्रुप ऑफ एट’मधील भारतात कॅम्पस सुरू करणारे UWA हे पहिले विद्यापीठ ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असली तरी पुढील पिढीसाठी तिला जागतिक ज्ञान आणि नवोपक्रम केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे ध्येय आहे. मुंबईलगत विकसित होत असलेल्या ‘मुंबई 3.0’ प्रकल्पात एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरची परिसंस्था तसेच संशोधन व उद्योगविकासाची नवी केंद्रे उभारली जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

विद्यार्थ्यांना जागतिक संधी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मुळे उच्च शिक्षण क्षेत्रात बदल झाले असून, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यास नवे दालन खुले झाले आहे. यापूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागत होते; आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

UWAच्या मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक वातावरणासोबतच देशातील प्रमुख वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, तंत्रज्ञान उद्योग, स्टार्टअप्स, संशोधक आणि उद्योजकांच्या परिसंस्थेशी जोडले जाण्याची संधी मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांत संयुक्त संशोधन व शैक्षणिक सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  महाखनिज २.०मुळे गौण खनिजांवर डिजिटल नजर; अवैध उत्खनन आणि महसूल गळतीला बसणार आळा

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया ज्ञानभागीदारी

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट क्षमता, तर महाराष्ट्राकडे व्यापक प्रतिभा आणि संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील ज्ञानाधिष्ठित भागीदारी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा मजबूत स्तंभ ठरू शकते, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. UWA महाराष्ट्राच्या विकासप्रवासाचा भागीदार बनले असून, या भागीदारीच्या वृद्धीसाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक यांनी UWAच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन हे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि भारत, विशेषतः महाराष्ट्र यांच्यातील संबंधांमधील ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगितले. गेल्या ३० वर्षांपासून मुंबई ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतातील सहभागाचे प्रमुख केंद्र राहिली आहे. शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योग आणि लोकसंपर्काच्या क्षेत्रात दोन्ही बाजूंमध्ये भागीदारी निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई आणि चेन्नई कॅम्पससाठी ८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक

UWAच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर यांनी मुंबई आणि चेन्नई येथील कॅम्पससाठी सुमारे ८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आल्याचे सांगितले. भारत-ऑस्ट्रेलिया संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी UWAच्या मुंबई कॅम्पससाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. विद्यापीठाने तीन भारतीय विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती जाहीर केल्याचे सांगत, यामुळे विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी होणारा परकीय चलनाचा खर्च वाचण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

राज्यातील विविध विद्यापीठांचे कॅम्पस ‘एज्युकेशन सिटी’मध्ये उभारले जात असून, भविष्यात तेथे सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button