वृक्षछाटणीतून निघणारे लाकूड अंत्यविधीसाठी मोफत देण्याचा पर्यावरणपूरक निर्णय..!
नगरसेविका अर्चना करांडे यांच्या उपसूचनेला स्थायी समितीची मंजुरी; पर्यावरणपूरक अभिनव संकल्पना कौतुकास्पद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत शहरातील विविध भागांमध्ये करण्यात येणाऱ्या वृक्षछाटणीतून जमा होणाऱ्या लाकडाचा आता विधायक आणि सामाजिक उपयोग होणार आहे. हे लाकूड महापालिका हद्दीतील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण उपसूचना नगरसेविका, स्थायी समिती सदस्य तथा ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सभापती अर्चना अक्षय करांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली.
अर्चना करांडे यांच्या या पर्यावरणपूरक आणि सामाजिक संवेदनशीलतेचा विचार करणाऱ्या उपसूचनेला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
हेही वाचा – UPI-MDRवरून राजकारण तापलं; ₹२ हजारांवरील व्यवहारांवर शुल्काचा दावा, ग्राहकांवर थेट भार नाही
महापालिकेच्या हद्दीत नियमितपणे धोकादायक किंवा वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि वृक्षछाटणीचे अवशेष मोठ्या प्रमाणात जमा होतात. अनेकदा या लाकडाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे करावी लागते. मात्र, या लाकडाचा उपयोग अंत्यविधीसाठी केल्यास एकीकडे त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागणार असून दुसरीकडे स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना लाकूड खरेदीचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, ‘वृक्षछाटणीतून निघणाऱ्या लाकडाचा पुनर्वापर आणि सामाजिक उपयोग’ या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर समन्वय साधला जाणार आहे. त्यामुळे अर्चना करांडे यांच्या या अभिनव संकल्पनेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
महापालिकेच्या उद्यान विभागाने वृक्षछाटणीतून जमा होणाऱ्या लाकडाचे योग्य संकलन, वर्गीकरण आणि साठवणूक करून ते शहरातील विविध स्मशानभूमींना अंत्यविधीसाठी उपलब्ध करून देण्याची कार्यपद्धती निश्चित करणे अपेक्षित आहे. पर्यावरणाचे रक्षण करताना उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा गरजू नागरिकांच्या उपयोगासाठी पुनर्वापर करण्याचा हा निर्णय सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरावा असा आमचा प्रयत्न आहे.
– अर्चना अक्षय करांडे नगरसेविका, स्थायी समिती सदस्य तथा ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय सभापती





