‘BRICS कोणाविरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न’; पंतप्रधान मोदींचा मोठा संदेश
भारताच्या अध्यक्षतेखालील BRICS परिषदेत मोदींचे संबोधन; ‘पुढील २० वर्षांसाठी महत्त्वाकांक्षी अजेंड्यावर काम करण्याची गरज’

नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली १८व्या BRICS शिखर परिषदेला सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेला संबोधित करताना BRICSच्या भविष्यातील वाटचालीचा दृष्टिकोन मांडला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली BRICSचे काम ‘लोककेंद्री आणि मानवता प्रथम’ या विचारावर आधारित असल्याचे सांगितले. लवचिकता, नाविन्यता, सहकार आणि शाश्वतता या भारताच्या प्रमुख प्राथमिकता राहिल्या आहेत. BRICSच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना या संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.
BRICSच्या २० वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख
यंदाची परिषद ऐतिहासिक असल्याचे सांगताना मोदी म्हणाले की, BRICS आपले २०वे वर्ष साजरे करत आहे. गेल्या दोन दशकांत या संघटनेने जागतिक मंचावर स्वतःची विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. एकमेकांच्या दृष्टिकोनाचा सन्मान करत आणि समन्वयातून पुढे जात BRICS कोणाविरोधात नसून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या BRICS अध्यक्षतेदरम्यान साडेतीनशेहून अधिक बैठका आयोजित करण्यात आल्या असून, ३० शहरांमध्ये विविध उपक्रम झाले. यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देशांचे आणि प्रतिनिधींचे मोदी यांनी आभार मानले.
हेही वाचा – मारबत उत्सवानंतर फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा; राजकीय चर्चांना उधाण
पुढील २० वर्षांसाठी महत्त्वाकांक्षी अजेंडा
आता BRICSला पुढील २० वर्षांसाठी नव्या आणि महत्त्वाकांक्षी अजेंड्यावर काम करावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले. संघटनेच्या कार्यपद्धतीतही सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. BRICSचे अध्यक्षपद दरवर्षी बदलत असल्याने ट्रॉयकाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि निर्णयांचा प्रभावी पाठपुरावा करता येईल, असे त्यांनी सुचवले.
प्रत्येक निर्णयासोबत नोडल पॉईंट, निश्चित कालमर्यादा आणि अंमलबजावणीची स्थिती निश्चित करण्याची गरज असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
जागतिक गव्हर्नन्समध्ये बदलाची गरज
जागतिक गव्हर्नन्सची सध्याची रचना पिरॅमिडसारखी असून, त्याच्या वरच्या स्तरावर शक्ती आणि निर्णय केंद्रीत आहेत, तर खालच्या स्तरावरील घटकांना निर्णय प्रक्रियेत मर्यादित सहभाग मिळतो, असे मोदी यांनी म्हटले.
ही पिरॅमिडसदृश रचना भागीदारीच्या मंचात बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मानवतेच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून जागतिक गव्हर्नन्समध्ये सुधारणा करण्यासाठी दहा प्रस्ताव तयार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
UN सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवर भर
जागतिक संस्थांमध्ये अधिक प्रतिनिधित्व, जबाबदारी आणि नियम बनवताना बदलत्या परिस्थितीचा विचार करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा आता टाळता येणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. मतदानाचे अधिकार आणि इतर धोरणे आजच्या जागतिक परिस्थितीनुसार तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे परिणाम पोहोचवण्यासाठी सामुदायिक जबाबदारीच्या आधारावर विचार करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी BRICS परिषदेत नमूद केले.




