ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PMRDA: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला टाळे ठोकण्याची वेळ!

अपेक्षित विकास झाला नसल्याचा महानगर नियोजन समितीचा आरोप

पुणे : पुणे महानगराच्या नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मागील १० ते १२ वर्षांत अपेक्षित प्रगती झालेली नाही. विकास आराखडा, रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) टाळे ठोकण्याची वेळ आली आहे, अशी टीका महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भोसले यांनी केली.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना भोसले यांनी पीएमआरडीएच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुण्याच्या विकासासाठी सर्वच पातळ्यांवर पीएमआरडीए अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी नागरी हक्क संघर्ष समितीचे सुधीर कुलकर्णी आणि अॅड. उमेश तारे उपस्थित होते.

चाकण, हिंजवडी परिसरातील कोंडी तसेच पायाभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी उद्योगांकडून आंदोलने करण्यात आली. मात्र, या प्रश्नांवर अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याचे भोसले यांनी सांगितले. नियोजनाच्या प्रक्रियेत गरजेच्या निकषांचा विचार करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड भाजपाचे आता ‘सेवा संकल्प अभियान’

पीएमआरडीएच्या आराखड्यासह स्ट्रक्चरल प्लॅनबाबत पुणे महानगर नियोजन समितीने न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेवर न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले असल्याचे सांगण्यात आले. पीएमआरडीएकडून वारंवार कर्तव्यात कसूर होत असून विकासकामांमध्येही अपेक्षित यश मिळालेले नाही, असा आरोप समितीने केला. त्यामुळे पीएमआरडीएचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा (SPA) दर्जा तसेच स्ट्रक्चरल प्लॅनचे अधिकार काढून घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. बांधकाम परवानग्या आणि विकास आराखड्याबाबत नगररचना विभागाने योग्य भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, पीएमआरडीएच्या कामकाजातील त्रुटी, विकासकामांतील दिरंगाई आणि संबंधित नियम-जवाबदाऱ्यांची पूर्तता याबाबतही समितीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पुणे महानगराच्या नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली. मात्र, गेल्या १० ते १२ वर्षांत अपेक्षित विकास झालेला नाही. डीपी, टीपी स्कीम, रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरही ठोस काम झालेले दिसत नाही. पुण्याच्या विकासासाठी सर्वच पातळ्यांवर पीएमआरडीए अपयशी ठरले आहे. चाकण आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी तसेच पायाभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी उद्योजकांना आंदोलन करावे लागते, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या कार्यपद्धतीचा फेरविचार करून गरजेच्या निकषांचा विचार करीत पुढील प्रक्रिया राबवावी. सध्याची परिस्थिती पाहता पीएमआरडीएला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे.”

— वसंत भोसले, सदस्य, महानगर नियोजन समिती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button