Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जरांगेंच्या आंदोलनाची धग वाढली; संभाजीनगरात सरकारची तातडीची बैठक, निर्णायक तोडग्याची शक्यता

स्मार्ट सिटी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप; हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांतील अडचणींवर होणार चर्चा, महाराष्ट्राचे लक्ष बैठकीच्या निर्णयाकडे

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १२ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अन्नपाणी त्यागल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, उपचार सुरू केल्यानंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाज अधिक आक्रमक झाला असून राज्यातील विविध भागांत रास्ता रोको आणि बंदची आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला असून, या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

सरकार, शिंदे समिती आणि अभ्यासकांची बैठक

सरकारचे शिष्टमंडळ, माजी न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक यांची आज छत्रपती संभाजीनगरातील स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक होत आहे. या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हैदराबाद गॅझेटनुसार उपलब्ध झालेल्या कुणबी नोंदी आणि त्याआधारे कुणबी प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणींवर बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी कार्यालयाभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

उदय सामंत, प्रसाद लाड बैठकीला उपस्थित राहणार?

आजच्या बैठकीला सरकारकडून नेमके कोण उपस्थित राहणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, कालच उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

त्यामुळे आजच्या बैठकीला उदय सामंत आणि प्रसाद लाड उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीनंतर सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो आणि त्यातून मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा –  PMRDA: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला टाळे ठोकण्याची वेळ!

जरांगे उपोषण मागे घेणार का?

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती आणि राज्यभर सुरू असलेली आंदोलने यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत जरांगेंच्या मागण्यांवर काही तोडगा निघणार का, सरकारकडून कोणता प्रस्ताव मांडला जाणार आणि त्यानंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा कायम आहे. नांदेड-नागपूर महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे आंदोलकांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक अडवली.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी सरकार तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सोलापुरात ‘शोले स्टाईल’ आंदोलन

दुसरीकडे सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजातील युवकांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. सोलापूर विद्यापीठासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून युवकांनी आंदोलन केले.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य होईपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगरात होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, बैठकीतून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काही निर्णायक तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button