Drishyam 3 Trailer : विजय साळगावकर पुन्हा अडकणार? ‘दृश्यम 3’चा थरारक ट्रेलर रिलीज
2 मिनिटे 49 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये रहस्य, दमदार संवाद आणि थरार; तब्बूसोबत जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांचीही महत्त्वाची भूमिका

मुंबई : ‘दृश्यम’च्या पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली. विजय साळगावकरच्या भूमिकेत अजय देवगणने आपल्या हुशारीने पोलिसांसह प्रत्येकालाच चकमा देत रचलेली कहाणी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरली. आता या लोकप्रिय फ्रँचायझीचा अंतिम अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘दृश्यम 3’चा ट्रेलर रिलीज झाला असून, तो पाहिल्यानंतर विजयसमोर यावेळी नेमके किती मोठे संकट उभे राहणार, याची उत्सुकता वाढली आहे.
२ मिनिटे ४९ सेकंदांचा हा ट्रेलर दमदार संवाद, रहस्य आणि थराराने भरलेला आहे. ट्रेलरची सुरुवात सौरभ शुक्ला यांच्या संवादाने होते. तब्बू त्यांना विजयच्या कथेचा पुढचा भाग लिहायचा झाला, तर यावेळी विजय काय करेल, असा प्रश्न विचारते.
यावर सौरभ शुक्ला म्हणतात, “विजय काय करेल, तो काय करणार नाही, हे फक्त विजयला माहीत आणि त्या देवाला…” यानंतर अजय देवगणचा विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात दिसतो. मात्र, यावेळी परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक गंभीर असल्याचे ट्रेलरवरून जाणवते.
विजयसमोर आता ‘मीरा’चा सूड
विजयच्या आयुष्यात पुन्हा एकदा मीरा देशमुखची एन्ट्री झाली आहे. तब्बू साकारत असलेली ही व्यक्तिरेखा आपल्या मुलगा सॅमच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी विजयच्या मागे लागली आहे
ट्रेलरमध्ये मीरा स्पष्टपणे सांगते की, तिला न्याय नको, तर मुलाच्या मृत्यूचा बदला हवा आहे. त्यामुळे यावेळी विजयला केवळ पोलिसांपासून स्वतःचा बचाव करायचा नाही, तर मीरा देशमुखच्या सूडापासून आपल्या कुटुंबाचेही रक्षण करायचे आहे.
अजय देवगणच्या “आता हा खेळ डोक्याचा नाही, तर नशिबाचा बनला आहे” या संवादातून आगामी संघर्षाची झलक मिळते.
हेही वाचा – पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक तोडगा काढावा: महापौर रवि लांडगे
प्रकाश राज आणि जयदीप अहलावत यांची दमदार एन्ट्री
अभिनेते प्रकाश राज हेदेखील ट्रेलरमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. ते मीरा देशमुख यांच्या वकिलाची भूमिका साकारत असून, विजयबद्दल त्यांचा एक दमदार संवाद ऐकायला मिळतो.
“तो अशिक्षित असेल, पण मूर्ख नाही. त्याला कमी लेखण्याची चूक मी करू शकत नाही,” असे ते विजयबद्दल म्हणतात.
मात्र, विजयसमोर यावेळी सर्वात मोठे आव्हान जयदीप अहलावत यांच्या व्यक्तिरेखेकडून उभे राहणार असल्याचे ट्रेलरवरून दिसते. जयदीप अहलावत या चित्रपटात क्राइम ब्रँचच्या एसपीची भूमिका साकारत असून, ते विजयला जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.
विजय पुन्हा सर्वांना चकवणार की खेळ संपणार?
‘दृश्यम 3’मध्ये विजय साळगावकरचा खेळ संपणार की तो पुन्हा एकदा आपल्या बुद्धीच्या जोरावर सर्वांना चकमा देणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल. निर्मात्यांनी या चित्रपटाला ‘दृश्यम: द कंक्लूजन’ असे नाव दिले आहे. त्यामुळे ही फ्रँचायझीचा अंतिम अध्याय असल्याचे संकेत मिळतात.
2 ऑक्टोबरला चित्रपट होणार रिलीज
‘दृश्यम 3’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय साळगावकरच्या कथेचा शेवट नेमका कसा होतो, मीरा देशमुखच्या सूडाचे काय होते आणि जयदीप अहलावतची व्यक्तिरेखा विजयचा डाव उलटवण्यात यशस्वी ठरते का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
‘दृश्यम’च्या या गूढ आणि थरारक कथेचा अंतिम अध्याय निर्माते नेमका कसा उलगडतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.





