एमपीएससीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंना बसवा; रोहित पवारांची मागणी

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या प्रकरणांवरून राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आयोगाच्या अध्यक्षांनी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांचा आयोगावरील उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी धडक आणि स्वच्छ प्रतिमेचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी,” अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी गट-ब, पीएसआय आणि कृषी विभागाच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे लक्ष वेधले. “परीक्षेचा पॅटर्न आधीच फुटत असेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर घोर अन्याय होतो. पुढील तीन दिवसांत यावर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर पुण्यात तब्बल ५० हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि राज्यभर हा वणवा पसरेल,” असा गंभीर इशारा पवार यांनी दिला.
हेही वाचा
ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर प्रश्न उपस्थित करताना रोहित पवार म्हणाले की, परीक्षांच्या नावाखाली खाजगी कंपन्यांना नियमबाह्य कामे दिली जात असून यामध्ये कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आहे. “विवेक भीमनवार आरटीओ आयुक्त असताना त्यांच्या काळात नेमकी कोणाकोणाला कंत्राटे देण्यात आली, याची संपूर्ण माहिती पुराव्यांसह मागवणार आहे. या प्रकरणात भीमनवार यांच्यासह अनेक बडे अधिकारी आणि सत्ताधारी मंत्री अडचणीत येतील,” असा मोठा दावाही त्यांनी केला. तसेच कृषी विभागाच्या आकृतिबंधावर घेतलेल्या निर्णयावरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.





