MPSC पेपरफुटीप्रकरणी रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘मोर्चाकडे दुर्लक्ष करू नका’
‘हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश हा सरकारच्या अपयशाचा पुरावा’; MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने राजीनामा द्यावा, रोहिणी खडसेंची मागणी

पुणे : एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पेपरफुटीविरोधात राज्यभरातील विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेत असताना विरोधकांकडूनही सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला ‘आक्रोश मोर्चा’ हा सरकारच्या अपयशाचा ढळढळीत पुरावा आहे, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता तातडीने योग्य त्या हालचाली कराव्यात, अशी मागणी केली आहे.
‘मोर्चातील मुलं शेतकरी आणि कष्टकऱ्यांची’
एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटी आणि भोंगळ कारभाराविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला आक्रोश मोर्चा हा सरकारच्या अपयशाचे प्रतीक असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
“या मोर्चातील मुलं ही शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची मुलं आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी काहींच्या वडिलांनी जमीन विकली आहे, तर काहींच्या वडिलांनी इतके कर्ज काढले आहे की आयुष्यभर कष्ट केले तरी ते फेडता येणार नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पेपरफुटीमुळे या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भविष्यातील स्वप्नांवर पाणी फेरले जात असल्याची नाराजीही रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली. “पेपर फोडणाऱ्यांनी त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे,” असे म्हणत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
हेही वाचा – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ICEC2NT-२०२६ आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे लाखो तरुण-तरुणींच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत रोहिणी खडसे यांनी आयोगाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवरही निशाणा साधला.
“मायबाप सरकारला जनाची नाही, मनाची तरी असेल, तर त्यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष न करता तातडीने हालचाली कराव्यात,” असे आवाहन त्यांनी केले.
तसेच लाखो तरुण-तरुणींच्या भवितव्याशी खेळणाऱ्या MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली आहे.
पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.




