चीनच्या जोडीला पराभूत करत सात्विक-चिरागने रचला इतिहास; ‘चायना मास्टर्स २०२६’वर कोरले नाव
१०व्या BWF World Tour विजेतेपदावरही मोहोर; अंतिम सामन्यात हे जिटिंग-रेन शियांगयू जोडीचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव

Satwik-Chirag : भारतीय बॅडमिंटनमधील स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे. अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात चिनी जोडीचा पराभव करत सात्विक-चिरागने प्रतिष्ठित ‘चायना मास्टर्स २०२६’ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयासह त्यांच्या कारकिर्दीतील १०व्या BWF World Tour विजेतेपदावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले.
चीनच्या घरच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत भारतीय जोडीने हे जिटिंग आणि रेन शियांगयू यांचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. तब्बल ७० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सात्विक आणि चिरागने प्रतिकूल परिस्थितीत संयम राखत शानदार पुनरागमन केले. या विजयासह चिनी जोडीविरुद्धचा त्यांचा ३-० असा अजेय विक्रम कायम राहिला.
पहिल्या गेममध्ये चिनी जोडीचे वर्चस्व
सामन्याची सुरुवात सात्विक-चिरागसाठी निराशाजनक झाली. चिनी खेळाडूंनी आक्रमक खेळ करत सुरुवातीलाच ५-० अशी आघाडी घेतली. नेटजवळील वेगवान हालचाली आणि आक्रमक स्मॅशच्या जोरावर त्यांनी भारतीय जोडीवर दबाव कायम ठेवला.
मध्यंतरापर्यंत चीनच्या जोडीने ११-५ अशी आघाडी घेतली होती. भारतीय खेळाडूंना पहिल्या गेममध्ये अपेक्षित लय सापडली नाही. काही अनावश्यक चुकांचाही फटका बसला आणि अवघ्या १८ मिनिटांत चिनी जोडीने पहिला गेम २१-११ असा जिंकला.
हेही वाचा – राज्यात पावसाची उघडीप; पुढील ४-५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता कमी, काही जिल्ह्यांत विजांसह सरी
दुसऱ्या गेममध्ये जोरदार कमबॅक
पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक-चिरागने शानदार पुनरागमन केले. चिनी जोडीने दुसऱ्या गेममध्ये २-० अशी आघाडी घेतली; मात्र भारतीय जोडीने लगेचच ३-३ आणि त्यानंतर ६-६ अशी बरोबरी साधली.
यानंतर सामन्यावरील नियंत्रण भारतीय जोडीने मिळवले. चिरागच्या आक्रमक स्मॅशचा प्रभाव दिसून आला आणि मध्यंतरापर्यंत भारताने ११-७ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम ठेवत सात्विक-चिरागने दुसरा गेम २१-१३ असा जिंकला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक गेममध्ये संयमाची कसोटी
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. चिनी जोडीने पुन्हा एकदा ४-० आणि त्यानंतर ७-३ अशी आघाडी घेतली. मात्र सात्विक-चिरागने हार न मानता सलग गुण मिळवत ७-७ अशी बरोबरी साधली.
मध्यंतरापर्यंत भारतीय जोडीने ११-९ अशी महत्त्वाची आघाडी मिळवली. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात चीनच्या जोडीने पुन्हा जोरदार पुनरागमन केले. त्यांनी स्कोअर १६-१६ आणि नंतर १७-१७ असा बरोबरीत आणला.
सामना निर्णायक टप्प्यावर पोहोचला असताना सात्विक आणि चिरागने आपला संयम ढळू दिला नाही. त्यांनी सलग चार गुण मिळवत तिसरा गेम २१-१७ असा जिंकला. पहिल्याच मॅच पॉइंटवर विजय निश्चित करत भारतीय जोडीने ‘चायना मास्टर्स २०२६’च्या जेतेपदावर आपले नाव कोरले.
या विजयामुळे सात्विक-चिरागने पुन्हा एकदा जागतिक बॅडमिंटनमधील आपले स्थान अधोरेखित केले असून, त्यांच्या कारकिर्दीतील १०व्या BWF World Tour विजेतेपदाचीही नोंद झाली आहे.





