TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात पावसाची उघडीप; पुढील ४-५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता कमी, काही जिल्ह्यांत विजांसह सरी

धुळे, नाशिक आणि नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार, द्वीपकल्पीय भारतात पुढील आठवडाभर पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे.

पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही भागांत स्थानिक वातावरणामुळे अचानक पावसाच्या सरी कोसळू शकतात.

‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पावसाचा जोर कमी असला तरी विजांचा कडकडाट आणि अचानक पावसाच्या सरींची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा –  “डीजे बंदीमुळे काहींना वाईट वाटत असेल तर वाटू द्या”; संजय शिरसाट यांचा डीजेबंदीला स्पष्ट पाठिंबा

महाराष्ट्रात पावसाचा जोर का कमी झाला?

सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. त्याचबरोबर मॉन्सूनचा मुख्य पट्टा महाराष्ट्रापासून उत्तर भारताच्या दिशेने सरकल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी झाल्याचे हवामान विभागाच्या अंदाजातून स्पष्ट होते.

यामुळे पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण, ऊन आणि अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी असे मिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे.

तापमानातही वाढ

पावसाचा जोर कमी झाल्याने राज्यातील काही भागांत तापमानात वाढ होत आहे. पुणे हवामान केंद्राच्या ६ सप्टेंबरच्या नोंदीनुसार पुण्यात कमाल तापमान २९.४ अंश सेल्सिअस, तर मुंबईत ३२.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

दरम्यान, मोठ्या पावसाची शक्यता कमी असली तरी स्थानिक वातावरणामुळे काही भागांत अचानक विजांसह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या ताज्या अंदाजाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button