“नाचण्याला विरोध नाही, पण हात उगारणे चुकीचे”; डीजे, शिक्षण आणि जरांगे आंदोलनावर सुप्रिया सुळे आक्रमक
“सरकारने सर्वांना एकत्र बोलावून मार्ग काढावा”; विद्यार्थ्यांवरील परीक्षांचा ताण आणि राज्यातील आंदोलनांवरही व्यक्त केली चिंता

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे आज नागपूर दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. डीजेचा वाद, शिक्षण विभागाचा कारभार, दहीहंडीतील मृत्यू, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तसेच राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
डीजेच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “वाद खूपच टोकाला गेला आहे. सरकारला विनंती आहे, सर्वांना एकत्र बोलावून मार्ग काढणे गरजेचे आहे.” शिक्षणाच्या माहेरघरात खाकीची भीती राहिली नसल्याचे सांगत त्यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी सरकारने लक्ष घालण्याची मागणी केली.
नागपूरचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, सण साजरे करणे ही आपली संस्कृती आहे. नाचण्याला विरोध नाही; मात्र हात उगारणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि नियम-कायदे सर्वत्र समान असायला हवेत. “नागपुरात कायदा चालू शकतो तर राज्यात का नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – रुग्णालयात राडा; आमदार पुत्रासह शिंदे गटाच्या ११ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
शिक्षण विभागाच्या कारभारावर भाष्य करताना सुळे यांनी सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले. काळानुसार शिक्षणपद्धतीत बदल होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक परीक्षांचा अभ्यास करावा लागत असल्याने त्यांच्यावर मोठा ताण येत आहे, असे त्या म्हणाल्या.
“नीटही द्यायची, बारावीची परीक्षाही द्यायची. मुलं खूप जास्त यात भरडली जात आहेत,” असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांना आवरावे, अशी भूमिका मांडली.
सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलण्यास नकार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, “मी बोलणे बंद केले आहे,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.
मुंबई दहीहंडी मृत्यू प्रकरणावर चिंता
मुंबईतील दहीहंडीच्या वेळी झालेल्या मृत्यूच्या घटनेवर बोलताना सुळे यांनी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले. “आपली आई, बायको आणि बहीण आपली वाट पाहत आहेत,” असे सांगत त्यांनी सण साजरे करताना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर चिंता
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतही सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने सुरू असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, “चिंताजनक आहे. २०० आमदारांचे सरकार आहे. काहीतरी चुकतंय. सरकारने आत्मचिंतन केले पाहिजे.”
राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारने संवाद साधून तोडगा काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.




