दहीहंडीच्या उत्सवात दुर्घटना; डीजेचा रॅक अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू
जुनी सांगवीतील घटनेने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ; आयोजक आणि डीजे मालकाच्या परवानग्यांवर प्रश्नचिन्ह

पिंपरी : दहीहंडीच्या उत्सवाची तयारी सुरू असतानाच पिंपरी-चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात भीषण दुर्घटना घडली. दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला डीजेचा रॅक अचानक कोसळून एका ४५ वर्षीय महिलेच्या अंगावर डीजे पडला. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, उत्सवाच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी परिसरात दहीहंडी कार्यक्रमासाठी डीजेचा रॅक उभारण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान रॅक अचानक कोसळला आणि त्यावरील डीजे महिलेच्या अंगावर पडला. दुर्घटनेनंतर महिलेला तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा – सराव शिबिरांत गोविंदा पथकांची रंगीत तालीम; १९ पथकांनी रचले नऊ थर
या घटनेनंतर दहीहंडी कार्यक्रमाच्या आयोजकांनी वाहतूक विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची आवश्यक परवानगी घेतली होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच डीजेचा रॅक उभारताना सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दुर्घटनेला जबाबदार कोण, तसेच कार्यक्रम आयोजक आणि डीजे मालकाकडून नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. तपासानंतर संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.




