कल्याण न्यायालयातील कॅन्टीनमध्ये अस्वच्छतेचा कळस; FDAकडून उपाहारगृह बंद
स्वच्छतागृहाच्या टाकीवर स्वयंपाकघर, सांडपाण्याजवळ खाद्यपदार्थांची विक्री; परवानाही नसल्याचे तपासणीत उघड

कल्याण : कल्याण न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये धक्कादायक अस्वच्छता आढळून आली आहे. स्वच्छतागृहाच्या टाकीवरच स्वयंपाकघर उभारून तेथे सिलेंडर ठेवून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत समोर आले. कॅन्टीनसमोरून स्वच्छतागृहाचे सांडपाणी वाहत असल्याने दुर्गंधी आणि माशांचा त्रास होत होता. या प्रकाराची तक्रार कल्याण बार असोसिएशनने FDAकडे केली होती. त्यानंतर FDAने कारवाई करत हे उपाहारगृह तातडीने बंद केले.
कल्याण न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार FDAच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता स्वच्छतागृहाच्या टाकीवरच स्वयंपाकघर उभारण्यात आल्याचे आढळले. याच ठिकाणी सिलेंडर ठेवून खाद्यपदार्थ तयार केले जात होते.
कॅन्टीनच्या समोरून स्वच्छतागृहातील सांडपाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. खाद्यपदार्थांवर माशा घोंघावत असल्याचेही तपासणीदरम्यान निदर्शनास आले. धूळ आणि अस्वच्छ वातावरणात नागरिकांना खाद्यपदार्थ दिले जात असल्याचेही समोर आले.
हेही वाचा – जरांगेंची प्रकृती खालावल्याने मराठा समाज आक्रमक; बीड-जालना महामार्गावर रास्तारोको
परवानाही नसल्याचे उघड
कल्याण बार असोसिएशनने या अस्वच्छतेबाबत FDAकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी कॅन्टीनची तपासणी केली. त्यावेळी चालकाकडे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचेही आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हा न्यायालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केवळ चहाची टपरी चालविण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, टपरीचा अनधिकृत विस्तार करून तेथे उपाहारगृह सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीची गंभीर दखल घेत FDAने धडक कारवाई करून हे उपाहारगृह बंद केले. त्यामुळे न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनच्या अस्वच्छ कारभारावर अखेर कारवाई झाली आहे.





