Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जिल्हा स्त्री रुग्णालयात एम्सच्या मानकानुसार अत्याधुनिक अतिदक्षता विभाग उभारणार

आगीच्या घटनेत तीन बालकांचा मृत्यू दुर्दैवी; ३६ नवजात बालकांना तातडीने हलवून उपचार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करण्यात येणार असून, हा विभाग एम्सच्या मानकानुसार अत्याधुनिक आणि सुसज्ज करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मुरके हॉस्पिटल तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

घटनेच्या वेळी नवजात शिशूंचे प्राण वाचविणे ही प्रशासनाची प्राथमिकता होती. त्यानुसार ३६ बालकांना तातडीने खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. या बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. घटनेनंतर जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी त्याच दिवशी रुग्णालयाला भेट देत चौकशी समितीची घोषणा केली होती. आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा –  कागलमध्ये जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’; राजर्षी शाहू महाराजांचा विचार देश-विदेशात पोहोचणार

जागतिक दर्जाची उपकरणे बसविणार

जिल्हा स्त्री रुग्णालयाला गेल्या दोन वर्षांत आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर्षी रुग्णालयाचा कोणताही प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाकडे प्रलंबित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयाच्या प्रस्तावांची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून छाननी केल्यानंतरच ते नियोजन विभागाकडे सादर केले जातात.

आगामी काळात अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करून त्यात जागतिक दर्जाची अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात येतील. या कामात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.

मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पाच लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश स्वप्नील बोरंगे, प्रफुल्ल चोपडे आणि गंगाराम बेठेकर या पालकांना पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. तसेच संकटाच्या काळात नवजात शिशूंवर मोफत उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button